हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| संपूर्ण राज्यभरात लाडकी बहिण योजना (Ladaki Bahin Yojana) चर्चेत असतानाच शिवसेनेचे आमदार आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी या योजनेबाबत एक मोठे विधान केले आहे. आज सकाळ कॉफी विथ सकाळ या कार्यक्रमात बोलताना आदित्य ठाकरे यांनी लाडकी बहिणी योजना लवकरच बंद पडेल, असे म्हटले आहे. तसेच, ही योजना नेमकी कधी बंद पडेल याची माहिती देखील आदित्य ठाकरे यांनी दिली आहे.
मुलाखतीत बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले की, “एव्हीएम घोळ लपवायला महायुतीने सर्व योजना आणल्या आहेत. मी कुठेही राजकारण न करता काम केलं आहे. मेट्रोची काम रखडली आहेत. मनपा निवडणुक झाल्यानंतर लाडकी बहीण योजना सरकारकडून बंद करण्यात येईल. तिर्थयात्रा योजना, शिवभोजनसह अनेक योजना सरकार बंद करेल. मतांचा घोळ लपवण्यासाठी सरकारने लाडकी बहीण योजना आणली होती. मात्र ती ही आता बंद होईल.”
त्याचबरोबर, “मी रात्री जाऊन गर्दी कमी असताना रस्त्यांची पाहणी करतो. त्यामुळे कोणतंही सरकार म्हणतं ते दोन वर्षात खड्डेमुक्त तर ते खोटं आहे. एकंदरीत मुंबईचे हाल करणं सुरु आहे. निवडणूका घेत नाहीत. पक्ष किती फोडू शकतो हे काम सुरु आहे. निवडणूक कोणतीही असो, आज स्थानिक नागरिकांना नगरसेवक नसल्याने कुठे जायचं ते समजत नाही. कचऱ्याची योजना ठप्प पडली आहे” असे देखील आदित्य ठाकरे यांनी म्हणले आहे.
दरम्यान, राज्यभरामध्ये लाडकी बहीण योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेचे हप्ते महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत.. त्यामुळे ही योजना सर्वसामान्यांना फसवणारे नाही असे सत्ताधाऱ्यांकडून म्हटले जात आहे. परंतु दुसऱ्या बाजूला सरकारच्या तिजोरीवरील भार वाढल्यामुळे तिर्थयात्रा योजना, शिवभोजनसह अनेक योजना बंद होण्याच्या मार्गावर आल्या आहेत. त्यामुळे विरोधक सरकारवर जोरदार टीका करत आहेत.