कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर आता युवानेतृत्व आदित्य ठाकरे यांनी संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढण्यास सुरूवात केली आहे. निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिंदे गटातील बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जावून कार्यकर्त्यांना बळ देण्याचे काम केले जात आहे. मंगळवारी दि. 2 ऑगस्टला आदित्य ठाकरे माजी गृहराज्यमंत्री व बंडखोर आ. शंभूराज देसाई यांच्या पाटण मतदार संघात येणार आहेत. याबाबतची माहिती शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत 40 शिवसेना आमदारांनी बंडखोरी केली. यामध्ये दोन आमदार आणि स्वतः एकनाथ शिंदे हे सातारा जिल्ह्यातील असल्याने या आदित्य ठाकरेंच्या या दाैऱ्यावर संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहणार आहे. आ. शंभूराज देसाई हे पाटण मतदार संघातून तर आ. महेश शिंदे हे कोरेगाव मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे मूळ गाव महाबळेश्वर तालुक्यातील आरे हे आहे. त्यामुळे आता 2 ऑगस्टला आदित्य ठाकरे या तिघांवर जोरदार तोफ डागणार हे नक्की. निष्ठा यात्रेचा दुसरा टप्पा दि. 1 व 2 ऑगस्टला सिंधुदुर्ग, कोल्हापुरात, पाटण, सातारा, पुणे असणार आहे. पहिल्या टप्प्यात मुंबई, ठाणे, औरंगाबाद, पैठण, शिर्डी अशी यात्रा केल्यानंतर आदित्य एक ऑगस्टला सिधुदुर्ग, कोल्हापूर आणि पुण्यात यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याकरीता दौऱ्यावर जाणार आहेत.
सोमवारी 1 ऑगस्ट रोजी सकाळी 11: 30 वाजता कुडाळ येथे निष्ठा यात्रा होईल. दुपारी 12: 30 वाजता सावंतवाडी येथे मेळावा होणार आहे. सायंकाळी 6: 30 वाजता कोल्हापूर शहर येथे मेळावा होईल. दोन ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता कोल्हापूर येथून शिरोळकडे रवाना होणार आहेत. दुपारी 12 वाजता शिरोळ येथे शिव संवाद यात्रा होईल. दुपारी 2 वाजता पाटण येथे निष्ठा यात्रा येईल करतील. तेथून ते पुढे पुण्याकडे रवाना होणार आहेत.
निसरे फाटा येथे होणार स्वागत
पाटण मतदार संघात आ. शंभूराज देसाई यांच्या बालेकिल्यात आदित्य ठाकरे येणार आहेत. निसरे फाटा येथे निष्ठा यात्रेचे स्वागत करण्यात येणार असून तेथून मल्हारपेठ पर्यंत रॅली काढण्यात येणार आहे. तेथे आमचे नेते आदित्य ठाकरे निष्ठा यात्रेच्या माध्यमातून शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहेत. तेथून ते उंब्रज मार्गे पुण्याकडे रवाना होतील, असे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख हर्षद कदम यांनी सांगितले.