हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बंगळुरू विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली. कोचीला निघालेल्या एअर इंडिया एक्स्प्रेस विमानाच्या इंजिनला आग लागल्याने (Aeroplane Engine Fire) केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावर इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या विमानात 179 प्रवासी आणि सहा क्रू मेंबर्स होते. या सर्वाना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं. महत्वाची बाब म्हणजे प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नाही.
याबाबत बेंगळुरू इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड (BIAL), केम्पेगौडा इंटरनॅशनल एअरपोर्टचे ऑपरेटर, प्रवक्ते म्हणाले,”18 मे 2024 रोजी, बंगळुरू ते कोचीला जाणाऱ्या IX 1132 विमानाच्या उजव्या बाजूच्या इंजिनमध्ये आग लागल्याचे निदर्शनास आलं, त्यानंतर तातडीने रात्री 11:12 वाजता बेंगळुरू विमानतळावर विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. विमान सुरक्षितपणे लँड झाल्यानंतर आग त्वरित विझवण्यात आली. तसेच 179 प्रवासी आणि ६ क्रू मेम्बर्सना सुखरूपपणे विमानातून बाहेर काढण्यात आले.
विमानाच्या टेकऑफनंतर उजव्या इंजिनमधून संशयास्पद आग दिसताच आम्ही बेंगळुरू-कोची विमान पुन्हा एकदा विमानतळावर मागे घेऊन आलो. यानंतर क्रूने सर्व प्रवाशांना इजा न होता यशस्वीरित्या बाहेर काढले. प्रवाशांनी शक्य तितक्या लवकर त्यांच्या डेस्टिनेशन पर्यंत पोहचता यावं यासाठी प्रवाशांसाठी पर्यायी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली होती, असे प्रवक्त्याने सांगितले. दरम्यान विमानाच्या इंजिनला आग कशी लागली याची सखोल चौकशी केली जाईल असेही प्रवक्त्याने सांगितलं.