हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । T20 World Cup मध्ये सर्वात मोठा उलटफेर आज सुपर ८ सामन्यात पाहायला मिळाला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाला अफगाणिस्तानच्या संघाने लोळवलं आहे. अफगाणिस्तानने ऑस्ट्रेलियाचा २१ धावांनी पराभव केला. गुलबद्दीन नैब हा अफगाणिस्तानच्या विजयाचा हिरो ठरला. त्याने ४ बळी घेत ऑस्ट्रेलियन फलंदाजांचे कंबरडं मोडलं. या विजयासह अफगाणिस्तानची उपांत्य फेरीची आशा कायम राहिली आहे.
प्रथम फलंदाजी करताना अफगाणिस्तानच्या संघाने २० षटकात १४८ धावा केल्या. सलामीवीर रहमतुल्ला गुरबाज आणि इब्राहिम जाद्रन यांनी ११५ धावांची दमदार सलामी दिली. मात्र दोघे बाद होताच अफगाणिस्तानचा डाव कोसळला. चांगली ओपनिंग पार्टनरशिप होऊनही अफगाणिस्तानला मोठ्या धावा उभारता आल्या नाहीत. ऑस्ट्रेलिया कडून जलदगती गोलंदाज पॅट कमिन्सने सलग दुसऱ्या सामन्यात हॅट्रिक घेतली. त्याच्याशिवाय ऍडम झम्पाने २ आणि मार्क्स स्टोइनीसने १ बळी घेतला.
प्रत्युत्तरात , ऑस्ट्रलियाला हे सोप्प आव्हान सुद्धा पेलवल नाही. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर आणि ट्रेव्हिड हेड स्वस्तात बाद झाले, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर आलेला मिचेल मार्श सुद्धा अवघ्या १२ धावा करू शकला. त्यानंतर ग्लेन मॅक्सवेलने एकाकी झुंज देत अवघ्या ४१ चेंडूत ५९ धावा केल्या. त्याने आपल्या खेळीत ६ चौकार आणि ३ षटकार मारले. मॅक्सवेल मैदानात असेपर्यंत ऑस्ट्रेलियाचा विजय नक्की मानला जात होता. मात्र गुलबुद्दीन नैबने १५ व्या षटकात त्याला बाद केल्यानंतर ऑस्ट्रेलियाचा डाव सुद्धा गडगडला. टीम डेव्हिड, मॅथ्यू वेड, पॅट कमिन्स संघाला विजय मिळवून देऊ शकले नाहीत. अफगाणिस्तानकडून गुलबुडीयन नैबने सर्वाधिक ४ बळी घेतले तर नवीन उल हकने ३ विकेट्स घेतल्या. या ऐतिहासिक विजयानंतर अफगाणिस्तानची उपांत्य फेरीची आशा कायम राहिली आहे.