परीक्षा देऊन फिरायला गेले अन्..; पुण्यातील दोघांचा दुर्दैवी मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मावळ : हॅलो महाराष्ट्र – पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यामध्ये दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बारावीची परीक्षा दिल्यानंतर संबंधित विद्यार्थी आपल्या अन्य काही मित्रांसोबत कासारासाई धरण परिसरात फिरायला गेले होते. या ठिकाणी धरणाच्या पाण्याचा अंदाज न आल्याने दोन जणांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. यावेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण ते त्यांना वाचवू शकले नाहीत.

दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर गावकरी आणि पोलिसांच्या मदतीने दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले. आरिष घोगी आणि विनय किसन कडू अशी मृत विद्यार्थ्यांची नावे आहेत. वेगवेगळ्या महाविद्यालयात शिकणारे सहा मित्र बारावीची परीक्षा दिल्यानंतर कासारसाई धरण परिसरात फिरायला गेले होते अशी माहिती शिरगाव परदंवडी पोलिसांनी दिली आहे. धरण परिसरात फिरायला गेले असता उन्हाचा चटका वाढल्याने सर्वजण धरणात पोहोण्यासाठी उतरले होते.

यावेळी आरिष आणि विनयचा अचानक तोल गेल्याने दोघे धरणात पडले. त्यांच्या बाकी मित्रांनी त्यांना वाचवण्याचा प्रयत्न मात्र त्यांना अपयश आले. यानंतर त्या विद्यार्थ्यांनी त्वरित या घटनेची माहिती पोलिसांना दिली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन गावकऱ्यांच्या मदतीने दोघांचा मृतदेह बाहेर काढला. फिरायला गेलेल्या दोन मित्रांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी शिरगाव परदंवडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.