शिवसेनेनंतर भाजपचा आणखी एक जुना मित्रपक्ष बाहेर एनडीएतून पडण्याच्या तयारीत

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निर्विवाद बहुमत मिळवून दुसऱ्यांदा केंद्रात सत्तेत आलेल्या भाजपला आपले मित्रपक्ष टिकवता येत नसल्याचं स्पष्ट होत आहे. शिवसेनेनंतर भाजपचा सर्वात जुना मित्र पक्ष असलेला पंजाबमधील शिरोमणी अकाल दलानंही भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (NDA) बाहेर पडण्याची तयारी केली आहे.

अकाली दलाचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी एनडीएतून बाहेर पडण्याचे संकेत दिले आहेत. लोकसभेत भाजपचे सध्या एकट्याचे बहुमत आहे. सत्तेसाठी भाजपला मित्र पक्षांची गरज नाही. मात्र, अकाली दलासारख्या जुन्या मित्र पक्षाने सोडून जाणे हे भाजपच्या राजकीय प्रतिमेच्या दृष्टीनं घातक ठरणार आहे. शिवाय, एका मागोमाग एक मित्र पक्ष दूर गेल्यास भाजपला राज्यसभेत अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळंही भाजपमध्ये अस्वस्थता आहे.

या मुद्द्यावरून भाजप आणि अकाली दलामध्ये पडली ठिणगी
शेतकरी हिताच्या मुद्द्यावरून भाजप आणि अकाली दलामध्ये ठिणगी पडली आहे. पेट्रोल-डिझेलच्या वाढत्या किंमतींनी या ठिणगीला हवा दिली आहे. शेतकऱ्यांना पेरणीसाठी मजूर मिळताना अडचणी येत आहेत. मिळालेच तर त्यांना जास्त मजुरी द्यावी लागत आहे. डिझेलच्या महागाईमुळं शेतकऱ्यांच्या हालाखीत आणखीच भर पडली आहे. केंद्र सरकारनं यावर गांभीर्यानं विचार न केल्यास अकाली दल सरकारमधून बाहेर पडेल, असं सुखबीरसिंग बादल यांनी म्हटलं आहे. सरकारनं डिझेलच्या किंमती कमी कराव्यात अशीही त्यांची मागणी आहे.

केंद्रातील मंत्रिपद गेलं तरी बेहत्तर पण..
भाजपच्या नेतृत्वाखालील सध्याच्या सरकारमध्ये अकाली दलाला एक कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. अकाली दलाच्या हरसिमरत कौर-बादल या केंद्रात अन्न प्रक्रिया खात्याच्या मंत्री आहेत. मात्र, शेतकऱ्यांच्या हितासाठी आम्ही कुठलाही त्याग करण्यास तयार आहोत. शेतमालाची खरेदी आणि किमान हमी भावाचे आश्वासन देऊनही केंद्र सरकार ते पूर्ण करत नसेल तर आम्ही मंत्रिपदाची पर्वा करणार नाही, असा इशारा सुखबीरसिंग यांनी दिला आहे.

राज्यसभेत भाजपाला बसू शकतो फटका
शिरोमणी अकाली दलाचे लोकसभेत सध्या २ तर, राज्यसभेत ३ खासदार आहेत. पंजाब विधानसभेत अकाली दलाचे १५ आमदार आहेत. अकाली दलाने साथ सोडल्यास राज्यसभेत महत्त्वाच्या निर्णयांच्या वेळी भाजपला अडचण होऊ शकते. दरम्यान, अकाली दलानं यापूर्वी नागरिकत्व (सुधारणा) कायद्यालाही विरोध केला होता. ‘सीएए’मध्ये मुस्लिमांचाही समावेश असावा, अशी भूमिका या पक्षानं घेतली होती.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”