सातारा प्रतिनिधी | वैभव बोडके
सातारा शहरातील रिलायन्स स्मार्ट सुपर स्टोअर या मॉलच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून शाळकरी मुलीने आत्महत्या केली आहे. सदरची हृदयद्रावक घटना रविवारी रात्री उशिराच्या सुमारास घडली. विद्यार्थ्यांच्या वाढदिवस पार्टीनंतर हा प्रकार घडला. दरम्यान, या घटनेने एकच खळबळ उडाली, आत्महत्येचे नेमके कारण काय याबाबत आता तर्कवितर्क काढले जात आहेत.
श्रेया श्रीकांत रासणे (वय- 16, रा. गडकर आळी, सातारा) असे मृत शाळकरी मुलीचे नाव आहे. श्रेया ही साताऱ्यातील इंग्रजी माध्यमाच्या एका नामांकित शाळेची दहावीतील विद्यार्थिनी होती. रविवारी सायंकाळी ती व अन्य 8 ते 9 मुले व मुली रिलायन्स मॉलच्या तिसऱ्या मजल्यावर वाढदिवसाची पार्टी करत होते. ही पार्टी झाल्यानंतर ते सर्वजण माघारी निघाले. यावेळी काहीजण लिफ्टमध्ये गेले.
यादरम्यान श्रेया मात्र लिफ्टच्या बाहेरच थांबली. तिने तिसऱ्या मजल्यावरून उडी मारली. यावेळी तिला वाचवण्यासाठी एका मित्राने धाव घेतली होती. मात्र, तरीही तिने उडी मारली. या घटनेने घटनास्थळ हादरून गेले. काही नागरिकांनी तिच्याकडे धाव घेतली. श्रेया रक्तबंबाळ होऊन पडली होती. तिला लगोलग जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता. दरम्यान, श्रेयाच्या कुटुंबीयांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.