औरंगाबाद – अंदाजे दोन दशकांनंतर औरंगाबाद शहरात मराठवाड्यासह मनमाड, अकोला, मध्य प्रदेशातील काही खासदारांची महत्त्वपूर्ण बैठक 20 ऑक्टोबर रोजी घेण्यात येणार आहे. यामध्ये प्रस्तावित रेल्वे मार्ग आणि लोकप्रतिनिधींच्या मागण्यांवर चर्चा होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.
केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी 16 सप्टेंबर रोजी औरंगाबादेत राष्ट्रीयीकृत बँकांच्या चेअरमन ची बैठक घेतल्यानंतर आता केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे हे देखील या ठिकाणी बैठक घेण्यासाठी सरसावले आहेत. दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक गजानन मल्ल्या यांनी 20 ऑक्टोबर रोजी औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात होणाऱ्या बैठकीविषयी खासदारांना निमंत्रण दिले आहे.
नांदेड येथे दक्षिण मध्य रेल्वेचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक कार्यालय आहे. या कार्यालयांतर्गत येणाऱ्या विभागातील लोकप्रतिनिधींची बैठक नांदेड येथे होत असते. ही बैठक सहा महिने किंवा एका वर्षाच्या अंतरात धोरणानुसार घेतली जाते. आज पर्यंत नांदेड येथे ही बैठक घेतली जात होती. औरंगाबादेत मात्र दोन दशकांपूर्वी बैठक झाल्याचे सांगण्यात येत आहे. या बैठकीत नवीन रेल्वे मार्ग, रेल्वे सेवा, स्थानकावरील सेवा, प्रवासी सुविधांसह काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होत असते.