शेतीला दिवसा वीज पुरवठा न केल्यास आंदोलन : सचिन नलवडे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
वडोली निळेश्वर, उत्तर पार्ले, करवडी व वाघेरी या गावांना शेती पंपासाठी रात्री 11.30 ते 6 वाजेपर्यंत वीज वितरण कडून शेतीसाठी वीजपुरवठा करण्यात येत आहे. पूर्ण वेळ रात्रीची वीज दिल्यामुळे शेतीला पाणी देणे अडचणीचे होत आहे. शेतामध्ये साप, विंचू, वन्यप्राणी यांचे वास्तव्य असते. उसाचे क्षेत्र दाटीवाटीचे असल्याने पाणी देताना रात्रीचे उसामध्ये जाता येत नाही. त्यामुळे शेतीसाठी दिवसा वीज पुरवठा करावा, अन्यथा आंदोलनचा बडगा उगारला जाईल असा इशारा रयत क्रांती संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन नलवडे यांनी दिला आहे.

आज वडोली येथील शेतकऱ्यांनी महावितरण ओगलेवाडी विभागाचे कार्यकारी अभियंता बुंदेले यांना निवेदन दिले. यावेळी सचिन नलवडे बोलत होते. ते म्हणाले, गेल्या आठ दिवसांपासून रात्रीची लाईट शेतीसाठी दिली जात आहे. यामुळे शेतकऱ्यांची गैरसोई होत आहे. वयस्कर शेतकरी, महिला शेतकरी यांना पूर्ण वेळ रात्री शेताला पाणी देणे जमत नाही. त्यामुळे पिके वाळून जात आहेत. वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. तेव्हा शेतीला दिवसा अथवा सकाळी विज पुरवठा करावा.

अजून तीव्र उन्हाळा सुरू नाही, तरीही शेतीला वीजपुरवठा पूर्ण दाबाने होत नाही. ऐन उन्हाळ्यात वीजवापर वाढल्यानंतर शेतकऱ्यांना अखंड व दिवसा विज मिळणार नाही. महावितरणने या प्रश्नाकडे त्वरित लक्ष घालून करवडी येथील सब स्टेशनचे काम पूर्ण करावे. अन्यथा सर्व शेतकऱ्यांना घेऊन रयत क्रांती संघटना तीव्र आंदोलन करणार असल्याचे सचिन नलवडे यांनी सांगितले.

प्रश्न सोडवा अन्यथा वीज बिल भरणार नाही
करवडी येथील सब स्टेशनचे काम त्वरित पूर्ण करावे, अन्यथा डिसेंबर नंतर सर्व शेतकरी मिळून तीव्र आंदोलन करतील. वारंवार निवेदन देऊनही महावितरणचे या मागणीकडे दुर्लक्ष होत आहे. आता शेतकरी आक्रमक झाला आहे. येणाऱ्या काळात हा प्रश्न सुटला नाही तर शेतकरी वीज बिल न भरण्यासाठी मोर्चा काढला जाईल, असेही शेतकऱ्यांनी यावेळी सांगितले.