सावरकरांच्या मुद्द्यावरुन ‘मविआ’ मध्ये फूट? काँग्रेसने स्पष्टच सांगितलं

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र्र ऑनलाईन । काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वीर सावरकर यांच्यावर टीका केल्यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते असा इशाराही दिला. राऊत यांच्या इशाऱ्या नंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते जयराम रमेश यावर स्पष्टीकरण देत सारवासारव केली आहे. राहुल गांधी यांच्या विधानाचा महाविकास आघाडीवर कोणताही परिणाम होणार नाही, असं त्यांनी म्हंटल.

जयराम रमेश यांनी आयोजित पत्रकार परिषदेत म्हंटल, राहुल गांधी यांच्या सावरकरांवरील टीकेमुळे महाविकास आघाडीवर त्याचा काही परिणाम होणार नाही. माझं संजय राऊतांशी बोलणं झालं यावर ते म्हणाले की, माझ्या मनात जे आहे ते मी म्हटलंय तर तुमच्या नेत्याच्या मनात जे आहे ते त्यांनी म्हटलंय. कारण हा वेगळा विचार आहे. वेगळा दृष्टीकोण आहे. मविआसाठी आम्ही किमान समान कार्यक्रम बनवला आणि या सरकारमध्ये सामिलही झालो असेही त्यांनी सांगितलं.

संजय राऊत नेमकं काय म्हणाले ?

मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी काँग्रेसला इशारा देताना महत्वाचे विधान केले. ते म्हणाले की, राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेला संपूर्ण देशभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. महाराष्ट्रात या यात्रेला सर्वात जास्त प्रतिसाद मिळाला आहे. खरं तर भारत जोडो यात्रा महागाई, बेरोजगारीपासून हुकूमशाहीच्या मुद्द्यावर सुरू असताना वीर सावरकर यांचा विषय काढण्याची गरज नव्हती. सावरकरांचा विषय काढल्याने फक्त शिवसेनाच नव्हे तर महाराष्ट्र काँग्रेसलाही धक्का बसला आहे. राहुल गांधींच्या सावरकरांबद्दलच्या वक्तव्यामुळे महाविकास आघाडीत फूट पडू शकते, असा इशारा त्यांनी दिला.

राहुल गांधी यांनी सावरकरांबद्दल नेमकं काय म्हंटल –

सावरकर इंग्रजांकडून पेन्शन घ्यायचे. काँग्रेसच्या स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधात जात ते इंग्रजांसोबत काम करायचे. सावरकरांनी इंग्रजांना पत्र लिहिली. त्यानंतर इंग्रजांनी त्यांना सोबत काम करण्याचं आमंत्रण दिलं. सावरकरांनी इंग्रजांसमोर हात जोडले आणि मी आपल्यासोबत काम करायला तयार आहे असे एकामागून एक सनसनाटी आरोप राहुल गांधी यांनी केले. एवढंच नव्हे तर सावरकर यांनी इंग्रजांना लिहिलेली चिट्ठीही त्यांनी वाचून दाखवली.