पाथर्डी तालुक्यातील धामणगाव ग्रामपंचायतमध्ये सत्तांतर ; तरुणांच्या लढाईचा विजय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अहमदनगर । राज्यातील ग्रामपंचयातीचे निकाल आज जाहीर झाले. पाथर्डी तालुक्यातील धामणगाव देवीचे ग्रामपंचायतची निवडणूकही प्रतिष्ठा पणाला लागेल अशीच झाली आहे. याठिकाणी तरुणांनी स्वबळावर लढलेल्या जय भवानी ग्रामविकास आघाडीने प्रस्थापितांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. गेल्या 25 वर्षानंतर धामणगावमध्ये सत्तांतर झालं आहे. गेल्या 25 वर्षांपासून गावच्या राजकारणात सक्रिय असलेले सरपंच भास्कर पोटे आणि वृद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याचे संचालक रामकीसन पाटील काकडे यांना मात्र मोठ्या पराभवाचा सामना करावा लागला. या बदलाच्या राजकारणामुळे धामणगावमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे.

एका सर्वसामान्य कुटुंबातील मुंबईला छोटसा व्यवसाय करणाऱ्या नवनाथ जालिंदर काकडे या तरुणाने गावच्या विकासाचं स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात उतरवण्यासाठी गावच्या युवकांना सोबत घेऊन निवडणूक लढायचा विचार केला आणि ते स्वबळावर विजयीही झाले. या तरुणांच्या दणदणीत विजयाने गावच्या राजकारणात मोठा बदल घडवून आणला आहे. नवनाथ काकडे यांच्या या लढाईत भाऊसाहेब मरकड, कुंडलिक कुटे, राजू चव्हाण, हनुमान मरकड, उद्धव काकडे, सचिन वारे या तरुणांची मोठी साथ मिळाली. लॉकडाऊनमध्ये गरजू कुटुंबांना नवनाथ काकडे यांनी जी जीवनावश्यक वस्तूंची मदत केली.त्याची आम्ही मतदानाच्या रुपात परतफेड करत आहोत अशी भावना मतदारांनी व्यक्त केली आहे.

दरम्यान या तरुणांनी दारू, पैसा या गोष्टींना फाटा देत विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवली. गावचे रखडले प्रश्न मतदारांसमोर मांडून त्यांचं मतपरिवर्तन करून मतदारांना विश्वासात घेत विजय मिळवला आहे. हा विजय माझा नसुन माझ्यावर विश्वास ठेवणारे माझे कार्यकर्ते आणि मतदारांचा आहे. अशी भावना नवनाथ काकडे यांनी व्यक्त केली आहे. मतदारांनी माझ्यावर दाखवलेल्या विश्वासाला मी तडा जाऊ देणार नाही. गावचा रखडलेला विकास हेच माझं ध्येय आहे असं आश्वासन नवनाथ काकडे यांनी गावकऱ्यांना दिल आहे. 15 जानेवारीला काकडे यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने ते रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यामुळे त्यांनी सोशल मिडियाद्वारे मतदारांचे आभार मानले आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’