Tuesday, January 7, 2025

AI मुळे वेब डिझाईन, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंगसह अनेक नोकऱ्या निर्माण झाल्या- संदिप पटेल

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सध्या दिवसेंदिवस आर्टिफिशियल इंटेलिजेंसची (Artificial Intelligence) प्रगती वाढत चालली आहे. यामुळेच देशभरात तरुणांसाठी नोकरीच्या संधी देखील निर्माण झाल्या आहेत. यालाच दुजोरा देत IBM इंडिया/दक्षिण आशियाचे व्यवस्थापकीय संचालक संदिप पटेल (Sandip Patel) यांनी एक महत्त्वाचे विधान केले आहे. त्यांनी म्हणले आहे की, “भविष्यात AI जेवढ्या नोकऱ्या काढून घेईल, त्यापेक्षा अधिक नोकऱ्या निर्माण देखील करेल. कारण मी कालांतराने अनेक नवकल्पनांना विकसित होताना पाहिले आहे”

AI मुळे लाखो नवीन नोकऱ्यांची निर्मिती झाली

आईएएनएसशी बोलताना पटेल म्हणाले की, “माझा ठाम विश्वास आहे की, AI च्या माध्यमातून जितक्या नोकऱ्या नष्ट होतील, त्यापेक्षा अधिक नोकर्यांची निर्मिती देखील होईल. सहसा लोक नवीन नोकऱ्यांची कल्पना करताना घाबरतात. उदाहरण द्यायचे झाले तर, इंटरनेटच्या आगमनामुळे वृत्तपत्र छपाईसारख्या काही क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये घट झाली. परंतु दुसऱ्या बाजुला वेब डिझाइन, डेटा सायन्स, डिजिटल मार्केटिंग आणि वेब प्रकाशनात लाखो नवीन नोकऱ्यांची निर्मिती ही झाली.”

तसेच, “आम्ही ज्या गोष्टींबाबत खूप स्पष्ट आहोत आणि त्यावर जोर देत आहोत त्यामध्ये रीस्किलिंग खूप महत्त्वाची भूमिका बजावेल. सध्या भारतातील 46 टक्के कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना ऑटोमेशन आणि एआय टूल्ससह काम करण्यासाठी प्रशिक्षण देत त्यांच्यामध्ये कौशल्य निर्माण करत आहेत. परंतु अजूनही यापेक्षाही अधिक गोष्टी करण्यासाठी वाव आहे. ही बाब सरकारला देखील स्पष्टपणे माहित आहे” असे स्पष्ट मत पटेल यांनी मांडले.

इतकेच नव्हे तर, “संस्थेतील 50 टक्के कर्मचारी म्हणतात की, ते नवीन AI आणि ऑटोमेशन टूल्ससह काम करण्यास उत्सुक आहेत. यात प्रश्न असा आहे की, तुम्ही लोकांच्या या गटाला कसे प्रशिक्षण देता? मुख्य म्हणजे, जशी ही तंत्रज्ञाने विकसित होत जातील तसेच तुम्हाला ही त्यांच्यासोबत काम करायला शिकावे लागेल” असे देखील त्यांनी सांगितले.

दरम्यान, आयटी आणि कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी यापूर्वी एका कार्यक्रमात बोलताना म्हटले होते की, “तंत्रज्ञान उद्योग आणि शैक्षणिक संस्थांनी AI च्या संबंधित नोकऱ्यांच्या निर्मितीसाठी जागतिक स्तरावर सरकारबरोबर एकत्र काम करण्याची आवश्यक आहे” त्यानंतर आता पटेल यांनी एआयमुळेच नोकऱ्यांची निर्मिती होईल असा विश्वास व्यक्त केला आहे.