औरंगाबाद – एसटी महामंडळाचे शासनात विलनीकरण करण्यासह विविध मागण्यासाठी एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी बुधवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर कर्मचाऱ्यांनी घेतलेल्या या पवित्र्यामुळे प्रवाशांचे मात्र हाल होत आहेत.
या उपोषणात दुसऱ्या दिवशी म्हणजे आज सकाळी मध्यवर्ती आणि सिडको बसस्थानकातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले, त्यामुळे प्रवासी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. त्याबरोबरच शहर बसही ठप्प झाली आहे. चिकलठाणा येथील आगाराच्या प्रवेशद्वारावर मोठ्या संख्येने कर्मचारी एकत्र जमले आहेत. आगारातून एकही बस बाहेर पडणार नाही, असा पवित्रा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. सकाळपासून केवळ तीनच बस आगारातून रवाना झाल्या आहेत. सिडको बसस्थानकातून सध्या केवळ मुक्कामी आलेल्या बस रवाना करण्यास प्राधान्य दिल्या जात आहे.
शहर बस सेवा ठप्प –
एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांनी कालपासून सुरू केलेल्या बेमुदत उपोषणात दुसऱ्या दिवशी मोठ्या संख्येने कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतल्याने औरंगाबाद शहर परिवहन सेवा देखील ठप्प झाली आहे यामुळे शहर बस सेवा ने प्रवास करणारे विद्यार्थी व प्रवाशांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे.