बलात्कार करणाऱ्यांचं सामानच काढून टाकलं पाहिजे: अजित पवार संतापले

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यात मागील काही दिवसांपासून लहान मुलींवर बलात्कार, अत्याचार आणि हत्या केल्याच्या घटना (Maharashtra Crime) सातत्याने वाढतच चालल्या आहेत. बदलापूर, नागपूर, कोल्हापूर, नालासोपारा, अकोला अशा जवळपास १० ते १२ घटना मागच्या आठवड्याभरात घडल्या आहेत. या एकूण सर्व घटनांनी महाराष्ट्रातील नागरिकांमध्ये संतापाची परिस्थिती निर्माण झाली आहे. बलात्कार करणाऱ्या नराधमांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी जनतेकडून करण्यात येत आहे. त्याच दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेलं एक विधान चांगलंच चर्चेत आले आहे. बलात्कार करणाऱ्यांचं सामानच काढून टाकलं पाहिजे असं अजित पवारांनी संतप्तपणे म्हंटल आहे.

अजित पवार हे नेहमीच आपल्या रोखठोक स्वभावासाठी ओळखले जातात. अनेकदा त्यांची याच स्वभावामुळे अडचणही झाली आहे. मात्र त्यांचा स्वभाव हा असाच कायम आहे. आज यवतमाळ येथे मुख्यमंत्री लाडकी बहीण कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात राज्यातील बलात्काराच्या घटनांवरून अजित पवारांनी संताप व्यक्त केला. राज्यात महिलांवर, मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. त्यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे सामानच काढले पाहिजे. परत नाहीच. हे केलंच पाहिजे इतके नालायक असे काही लोक आहेत असं अजित पवारांनी म्हंटल .

काही विकृत माणसे असतात काही नराधम असतात. पण जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे, आमच्या बहिणीवर जे हात घालतात त्याच्यावर कडक कारवाई करणार. मग तो कितीही मोठ्या बापाचा असूद्या किंवा कितीही मोठ्या वशिल्याचा असू द्या, त्याची फिकिर आम्ही करणार नाही. त्याच्याबद्दल कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे. महिलांसाठीचा शक्ती कायदा दिल्लीत राष्ट्रपतींकडे गेला आहे, तो लवकर मंजूर करुन आणायचा आहे. असं अजित पवार यांनी सांगितलं. यावेळी त्यांनी विरोधकांच्या निषेध आंदोलनावरही भाष्य केलं. विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने जो काय विरोध करायचा तो करा . लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही, असं अजित पवार म्हणाले.