हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नेहमीच त्यांच्या रोखठोक आणि सडेतोड वक्तव्यासाठी ओळखले जातात. आज अजित पवार हे बीड दौऱ्यावर असून त्यांनी प[पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. कानपिचक्या देऊन अजित पवारांनी आपलं भाषण गाजवलं. यावेळी बोलता बोलता अजित पवार असं एक वाक्य बोलून गेले ज्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. आई-वडील अन् चुलत्याच्या कृपेनं आमचं बरं चाललंय असं अजित पवार आपल्या भाषणात म्हणाले. त्यामुळे राजकीय तर्क वितर्काना उधाण आलं. तसेच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? या चर्चेलाही जोर आला.
अजित पवार म्हणाले, मला भेटायला येताना स्मृतीचिन्हं वगैरे काही काही आणू नका…. काहीजण मोठा हार आणतात आणि त्याची पिशवी तशीच खाली ठेवतात. अशा खाली ठेवल्या जाणाऱ्या पिशव्या मी उचलायला सुरुवात केल्यानंतर काहीजण आता लाजंकाजं ते उचलायला लागले आहेत. पण असा सत्कार करण्याची काहीही गरज नाही. तुम्ही प्रेमाने केलेला नमस्कार आपल्यासाठी पुरेसा आहे.. आपल्यासाठी काही काही आणू नका, कर्मधर्म सहयोगाने आई वडिलांच्या कृपेने, चुलत्याच्या कृपेने चांगलं चाललंय आमचं. काही देऊ नका… माझा नमस्कार घ्या तुमचाही नमस्कार द्या. पायाही पडू नका. आजचे पुढारी पाया पडण्याच्या लायकीचे नाहीत. ज्याच्या पाया पडता त्याचा इतिहास आठवा.. असं अजित पवार म्हणाले. अजित पवार यांच्या चुलत्याच्या कृपेने बरचं चागंल चाललय, या वक्तव्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? याची चर्चा सुरू झाली आहे.
यावेळी आपल्या भाषणात अजित पवारांनी कार्यकर्त्यांना खडेबोल सुद्धा सुनावले. मला निधी देण्याचा अधिकार आहे तसंच तो निधी कोणत्या कामांसाठी मागितला जातोय याची शहानिशा करण्याचा अधिकरही आहे असं अजित पवार म्हणाले. चुकीचं काम केल्यास मी तुम्हाला सोडवायला येणार नाही अशी भूमिका त्यांनी मांडली. इथं कुणाचीही दादागिरी खपवून घेतली जाणार नाही. कुणी जर चुकीचं वागत असेल आणि त्याचे धागेदोरे लांबपर्यंत जात असतील तर त्याला पाठीशी घातलं जाणार नाही असा इशारा अजितदादांनी दिला. आपल्या आसपास चुकीच्या प्रवृत्तीचे लोक असता कामा नये. एखादी गोष्ट हलक्यात घेतली तर त्याची किंमत पक्षाला आणि कार्यकर्त्यांना किंमत मोजावी लागते, असा सल्ला देखील त्यांनी कार्यकर्त्यांना दिला. आगामी काळात बीड जिल्ह्यात विविध विकासकामांसाठी मी निधी देणार आहे. जिल्ह्यात विमानतळ, सायन्स सेंटर अशा नवनव्या गोष्टी येतील,” असंही यावेळी अजित पवारांनी सांगितलं.