हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन ।महिला लोकसभेत गेल्यावर त्यांचा नवरा पर्स घेऊन मागे जाणार. आता अजित पवार (Ajit Pawar) काय पर्स घेऊन जाईल, तुम्हाला पटतं का? म्हणजे तुम्ही लोकसभेत जाताना सदानंद सुळे पर्स घेऊन जातात काय? अरे मला अशी उत्तर देता येतील की तुम्हाला पळता भुई थोडी होईल…बारामती लोकसभेच्या प्रचाराच्या तोफा थंडावताना अजित पवारांनी बारामतीत घेतलेल्या सांगता सभेतील ही जहरी टीका. अजितदादांनी याच शेवटच्या काही सभांमध्ये पवार कुटुंबातल्या सुप्रियाताईंचा प्रचार करणाऱ्या प्रत्येक सदस्यावर चांगला जाळ काढला. अजितदादा मागचा, पुढचा विचार न करता मनाला जे वाटेल ते बेधडकपणे बोलतात. मुळात ती त्यांच्या राजकारणाची खासियत आहे. पण याच आपल्या स्किलमुळे ते अनेकदा अडचणीत देखील सापडले. भाषण करताना आपलं आपल्यावर कंट्रोल नसतं हे अजितदादांना माहीत असल्यानं सुनेत्रा वहिनींच्या मॅरेथॉन प्रचारातही अजित दादा प्रत्येक शब्द तोलून मापून बोलत होते. एकदा का चुकून वाकड काही बोललं गेलं तर त्याचा विरोधक बाऊ करून आपली सीट धोक्यात येऊ शकते, याची कल्पना त्यांना होती. पण शेवटच्या काही दिवसांत अजितदादांच्या भावनांचा बांध फुटला. आणि शरद पवारांपासून ते आपल्या सख्ख्या भावावरही अजित दादा तुटून पडले. बारामती हातातून निसटत असल्याचं दिसत असल्यामुळेच अजितदादांचा तोल सुटत चाललाय का? अजितदादा प्रचाराच्या शेवटाला कुटुंबातील सदस्यांना पर्सनली का टारगेट करतायत? हेच पाहुयात
अजित पवारांचं वक्तृत्व म्हणजे खटक्यावर बोट जागेवर पलटी… ऑन दी स्पॉट जे सुचल ते कसलीही भीड न बाळगता बोलून टाकणं ही अजितदादांची स्टाईल. पण आपल्या याच गोष्टींचा त्यांना अनेकदा फटका बसला. एकदा तर त्यांच्या राजकीय कारकीर्दच धोक्यात आली. गेलाबाजार घटनाक्रम जाऊद्या. पण राष्ट्रवादी फोडल्यानंतर बारामतीत नणंद विरुद्ध भावजयी असा पेच निर्माण करून चिन्हं, नाव, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेवटी पवार कुटुंबातही फूट पाडली…गरज नसताना बारामतीची जागा प्रतिष्ठेची बनवली. घरातील सदस्य न देता पक्षातील दुसरा चेहराही ते बारामतीतून उभे करू शकले असते. पण स्वतःच्या पत्नीलाच तिकीट देऊन त्यांनी पवार कुटुंबाला राजकारणाच्या मैदानात ओढलं. आणि तेव्हापासून बारामतीची जागा राखण्यासाठी दोन्ही गट दिवसाचा रात्र करून प्रचार करतायत. बारामतीत कोण जिंकणार? याचा निकाल काट्याचा बनलेला असताना शरद पवारांच्या पाठीशी असणारी भावनिकतेची लाट पाहता बारामतीत तुतारी वाजणारच, असं गावागावातून बोललं जातंय. त्यात सुप्रियाताईंच्या प्रचाराला अजित पवार सोडता संपूर्ण पवार कुटुंबीय उतरल्याने बारामतीच्या रिंगणात दादा एकटे पडले होते.
तेव्हा त्यांनी गाव पातळीवरील आपल्या कार्यकर्त्यांची फिल्डिंग लावली, महायुतीच्या गावागावात सभा लावल्या, घोंगडी बैठका पार पडू लागल्या आणि बघता बघता वार सुनेत्रा वहिनींच्या बाजूने झुकल्याचं आढळून आलं. त्यात शरद पवारांनी आतली विरुद्ध बाहेरीची असं बोलून स्वतःहून ओढवलेला वाद सुप्रिया ताईंना बॅक फुटला टाकणारा होता. आता गरज होती बारामती तयार झालेलं हे मोमेंटम कायम ठेवण्याची… मी रोज सकाळी उठल्यावर लोकांना भेटायला जातो, तेव्हा डोक्यावर बर्फ ठेवून जातो. आज चिडायचे नाही आवाज चढवायचा नाही, असे स्वतःला बजावत असतो… असं अजितदादांनी भर सभेत केलेलं वक्तव्य म्हणजे आपण आपल्या तोंडाने अडचणीत येणार नाही याची ते काळजीच घेत होते. काही वादग्रस्त वक्तव्य सोडली तर अजित दादांचा म्हणावा असा तोल काही सुटला नाही. त्यामुळे शरद पवार गटातील नेते आणि कार्यकर्त्यांचं पित्त खवळलं असणार एवढं नक्की…
पण अजितदादा खरे फसले ते पवार कुटुंबीयांवर वैयक्तिक टीका करून… प्रचाराच्या सगळ्या प्रोसेसमध्ये अजितदादा एक वाक्य नेहमी रिपीट करत होते ते म्हणजे ‘भावनिक होऊ नका…’ त्यानुसार स्वतः दादांनीही आपल्यावर होत असलेल्या टिकांकडे दुर्लक्ष केलं होतं. पण विरोधाचा सूर तीव्र होत चालला तसा अजितदादांच्या भाषेत त्यांचा जुना रगेलपणा आला. त्यांनी जाहीर सभेतून कुणाचीही हयगय सोडली नाही. राष्ट्रवादीच्या फुटीनंतरचा प्रसंग सांगताना रोहित पवार यांना रडू कोसळलं. आणि सर्वजण स्तब्ध झाले. मात्र या प्रसंगाची अजितदादांनी त्यांच्या सभेतून खिल्ली उडवली. आमच्या एका पठ्ठ्याने तर डोळ्यातून पाणी काढले. मी पण पाणी काढूनदाखवतो मला मतदान द्या. असली नौटंकी बारामतीकर अजिबात खपवून घेणार नाहीत. हा रडीचा डाव झाला… असं म्हणत त्यांनी रोहित पवारांना टार्गेट केलं. याआधी सुद्धा तुला जिल्हा परिषदेचं तिकीट मी दिलं, आमदार मी बनवलं, तू ज्या शाळेत शिकतोयस त्याचा हेडमास्टर मी आहे. अशा शब्दात वारंवार ते रोहित पवारांना पर्सनली घेत होते…
अजित पवारांनी बारामती तालुका कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष युगेंद्र पवार यांनाही सांगता सभेतून झोडलं. काही-काही जण तर कधी आयुष्यात कुस्ती खेळले नाहीत आणि कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष झाले. अरे, कुस्तीचे डाव माहितीय का बेटा? घुटनाचीत कशाला म्हणतात? कुठल्या डावाला काय म्हणतात? चीतपट कशाला म्हणतात? उगीच आम्ही बोलत नाही, त्याच्यामुळे काहीजण वेगवेगळ्या पद्धतीने भाषणं करु लागले. तुम्ही फार वरती उड्या मारु नका, हे औट घटकेचं आहे. असं म्हणत अजितदादांनी त्यांचाच सख्खा भाऊ श्रीनिवास पवार यांचे चिरंजीव आणि सुप्रिया सुळेंच्या प्रचाराची कमान सांभाळणाऱ्या युगेंद्र पवार यांना हा टोला लगावला. अजितदादांनी आतापर्यंत घेतलेली संयमाची भूमिका सांगता सभेला मात्र सुटली. आणि ते थेट सुप्रिया सुळेंच्या बाजूने असणाऱ्या आपल्याच घरातील सदस्यांना शिंगावर घेऊ लागले…
आता ते नुसते प्रचाराला येत आहेत. ४ जून येऊ द्या. त्यानंतर यातील कोणीही जर तुम्हाला भेटायला आला तर मी मिशी काढून देईन. यांना मतदारांशी काहीही घेणंदेणं नाही. सगळे माझ्याच घरचे आहेत. पण आता फार चुरुचुरु बोलत आहेत. सगळे पोपटासारखे बोलू लागले आहेत. एकदा माझ्यासमोर या. मग बघू कोण कोणाला ऐकतंय, असं म्हणत अजितदादांनी विरोधात गेलेल्या सगळ्याच पवार कुटुंबातील सदस्यांना झोडल. पण या सगळ्यामुळे होतं काय की, शरद पवारांच्या पाठीमागे असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेला आणखीन जास्त हवा मिळते. अजितदादा यांच्या शब्दातील काटकपणाने सुज्ञ मतदारही दुखावले जातात. आणि याचाच परिणाम अजित दादांच्या विरोधात जाऊ शकतो. बारामतीत आपली बाजू पडती आहे, हे लक्षात आल्यामुळे देखील अजितदादांचा आपल्या शब्दांवरचा कंट्रोल सुटला असावा… असो 4 जूनला दूध का दूध पानी का पानी होईलच. पण अजितदादांनी आपल्याच कुटुंबावर केलेली ही टीका त्यांच्या अंगलट येईल का? 2024 ला खासदार कोण असेल? सुप्रिया ताई की सुनेत्रा वहिनी? तुमची मतं, प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा