राष्ट्रवादीचे नेते, आमदार भाजपच्या संपर्कात; मुहूर्त ठरणे बाकी…

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजितदादा (Ajit Pawar) यांनी भलीमोठी रिस्क घेऊन शरद पवारांसोबत वाकडं घेत राष्ट्रवादी फोडली.. भाजपवर विश्वास ठेवला…विकासाच्या राजकारणासाठी भाजपच्या हातात हात घालत महाराष्ट्राच्या सत्तेचे वाटेकरी बनले…अजितदादांना उपमुख्यमंत्री केलं… सोबत आलेल्या नेत्यांना मलाईदार खाती दिली…थोडक्यात शरद पवारांच्या विरोधात अजितदादांचे जितकं बळ देता येईल, तितकं भाजपने दिलं…पक्षाचे नाव, घड्याळ हे चिन्ह मिळाल्यामुळे तर अजित पवार गटाची जोरदार हवा होती…याच हवेच्या जीवावर अजितदादांनी लोकसभेच्या चार जागा लढवल्या आणि त्यातली कशीबशी एक जागा जिंकत बाकीच्या ठिकाणी अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दारुण पराभव झाला… सर्वात जास्त प्रतिष्ठेची बनवलेली बारामतीची जागाही दीड लाख मतांनी गमवावी लागल्यानं अजितदादांच्या भोवती फुगवलेला नेतृत्वाचा फुगा अखेर फुटला…

संघानं तर भाजपच्या पराभवाचं खापरच अजित दादांवर फोडलं… हे कमी होतं की काय म्हणून राजकारणाच्या आतल्या गोटातून एक महत्त्वाची बातमी समोर येतेय… ती म्हणजे राष्ट्रवादीच्या नव्या फुटीची… होय राष्ट्रवादीत एकदा फूट पडल्यानंतर आता अजितदादांच्या राष्ट्रवादीत अनेक हालचाली सुरू असून लवकरच त्यात फूट पडणार असल्याची माहिती समोर येतेय…आयुष्यातली सर्वात मोठी पॉलिटिकल रिस्क ज्यांच्या भरोशावर घेतली त्याच भाजपने ही फूट घडवून आणण्याचा प्लॅन तर रचला नाहीये ना? अशीही शंका आता घेतली जातीय…अजितदादांच्या पक्षातील नेमका कोणता मोठा सहकारी फुटीच्या उंबरठ्यावर आहे? अजितदादांना भाजपने आपल्या चक्रव्ह्यूमध्ये कसं अडकवून ठेवलंय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…

YouTube video player

अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या फुटीचा पहिला सुगावा लागतो तो राष्ट्रवादीच्या नेत्यांची भाजपशी वाढलेली जवळीक

लोकसभेच्या निकालात राष्ट्रवादीला केवळ रायगडची जागा वाचविण्यात यश आलं…तीही जागा सुनील तटकरे यांनी स्थानिक मुद्द्यांच्या अवतीभोवती फिरवल्यामुळे ते त्यांचं वैयक्तिक यश म्हणावं लागेल… प्रदेशाध्यक्ष असतानाही त्यांनी रायगड मधील प्रचारासाठी संघटनेचा फोर्स वापरला नाही…एक जागा वाचवता आल्यानं भाजपने राष्ट्रवादी समोर मंत्री पदाचा प्रस्ताव ठेवला… प्रफ्फुल पटेल यांना केंद्रीय राज्यमंत्रीपदाची ही ऑफर होती.. पण असं असतानाही कॅबिनेटचा हट्ट धरत अजितदादांनी हा प्रस्ताव नाकारला… वास्तविक पाहता प्रफुल्ल पटेल यांना मंत्रिपद हवं होतं… पण त्यांची भाजपसोबत वाढलेली जवळीक पाहता अजितदादा थोडे सावध झाल्याचं बोललं जातंय… आपल्या सोबत फिरणारे अनेक नेते काळवेळ पाहून भाजपसोबत जाणार असल्याच्या चर्चा असल्याने भाजप समोरून कुरवाळून मागून गेम करतंय का? असा प्रश्न आता अजितदादांना पडला असावा…आपलं राजकारण जिवंत ठेवण्यासाठी हे बडे नेते भाजपच्या मदतीने दिल्लीत सेटल होण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा दिल्लीच्या वर्तुळात रंगलीय… त्यामुळे राष्ट्रवादीतील महत्त्वाच्या आणि मुरलेल्या नेत्यांना आगामी विधानसभा आणि इतर निवडणुकांसाठी आपल्या गोटात घेण्याचा भाजपचा प्लॅन असू शकतो…

राष्ट्रवादी फुटू शकते याचं आणखीन एक स्ट्रॉंग कारण देता येतं ते म्हणजे आमदार फुटण्याची धाकधूक…

राष्ट्रवादीच्या फुटीत चाळीस आमदारांनी अजितदादांना साथ दिली…आमदारांच्या बैठकीतही हा आकडा 40 च्या आसपास राहिलाय… पण लोकसभेच्या निकालानंतर यातले 15 ते 20 आमदार आमच्या संपर्कात असल्याचा दावा शरद पवार गटाने वारंवार केला आहे…रोहित पवार तर अगदी आत्मविश्वासानं विधानसभेचं बिगुल वाजलं की त्याआधी हे नेते आमच्या सोबत येतील असं बोलून दाखवलंय…यासोबतच अजितदादांचे काही आमदार भाजपसोबतही संपर्क ठेवून असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात असते…थोडक्यात सध्या अजितदादांच्या आमदारांपैकी सध्या तरी कुणी बंडाची भूमिका घेतली नसली..तरी जसजशी विधानसभा जवळ येईल तसतस अजित पवार गटातून मोठ्या प्रमाणावर आमदारांची गळती सुरू होण्याची शक्यता आहे…कारण लोकसभेच्या निकालाने आधीच आमदारांची धाकधूक वाढली आहे… जनतेचा कौल हा तुतारीच्या बाजूने असल्याने घड्याळाच्या चिन्हावर निवडणुकीला सामोर गेलं तर सहानुभूतीचा मोठा फटका आपल्या आमदारकीला बसण्याचा धोका या नेत्यांना वाटतोय…

एवढंच नाही तर राष्ट्रवादीतील दहा ते पंधरा आमदार ऐन मोक्याच्या टायमिंगला भाजपमध्ये जाण्यासाठी फिल्डिंग लावून बसल्याचीही चर्चा आहे… त्यात राष्ट्रवादीचे अनेक आमदार खासगित आपण मनाने शरद पवारांसोबत असल्याचं मान्यही करतात…त्यामुळे अजितदादांचे आमदार फुटले…की पक्षही आपोआप फुटतोय, हे वेगळ्या शब्दात सांगायला नको… अजितदादांची राष्ट्रवादी भाजपला फोडायचीये असं म्हणण्यामागचं शेवटचं कारण सांगता येतं ते म्हणजे राष्ट्रवादीची संपलेली उपयुक्तता….. अजित पवारांना सोबत घेऊन येणाऱ्या जुलैमध्ये एक वर्ष पूर्ण होईल…पण संपूर्ण वर्षभरात राष्ट्रवादीला सोबत घेतल्याने भाजपची इमेज खराब झालीच…पण त्यासोबत लोकसभेला त्यांना मोठा फटका बसला… त्यात कशीबशी एक जागा जिंकूनही कॅबिनेट मंत्रीपदाचा धरलेला हट्ट… सुनेत्रा वहिनींना दिलेली खासदारकी…हे सगळं कळत नकळतपणे भाजपच्या अंगलट येणारं प्रकरण आहे…याआधी सुद्धा विविध प्रकरणातून अजितदादा आणि त्यांच्या सहकाऱ्यांना देण्यात आलेल्या क्लीनचीट आणि त्यांची मीडियामध्ये होणारी बोंब त्यामुळे भ्रष्टाचारांना पाठीशी घालण्याचं खापर भाजपवर फुटतय…हेच बघून येणाऱ्या विधानसभेला अजित दादांना सोबत घेऊन आमदारकी लढणं भाजपला परवडणार नाही…त्यामुळे राष्ट्रवादीला बाजूला करण्याचा कार्यक्रम आता भाजपकडून होऊ शकतो…पण मित्रपक्ष म्हणून भाजपला चिकटलेल्या राष्ट्रवादीला सहजासहजी वेगळं करणं आता काही शक्य नाहीये…त्यामुळे या सगळ्याला एकच गोष्ट तारून नेऊ शकते…ती म्हणजे पक्षांतर्गत फूट…

अजित पवार गटातील अनेक मातब्बर नेते नाराज असल्याची चर्चा माध्यमांमध्ये आहे…त्यांच्या नाराजीला खतपाणी घालून पक्षात काड्या लावण्याचा कार्यक्रम भाजपकडून होऊ शकतो… राष्ट्रीय स्वयंसेवक संघानही अजितदादांना सेप्रेट करण्यासाठी भाजपवर प्रेशर आणल्याने फडणवीसांना वेळीच काहीतरी पावलं उचलावी लागणार आहेत…त्यामुळे भाजप अप्रत्यक्षरीत्या अजितदादा गटात फूट पाडून आमदारकीचा रस्ता आपल्यासाठी सोयीचा करून घेईल का? अशी शंकाही यानिमित्ताने उपस्थित होते…शेवटी अजितदादांमुळे भाजपची ब्रँड व्हॅल्यू कमी झाली हे तयार करण्यात आलेलं नरेटीव, अजित पवार गटातील आमदारांची वाढलेली धाकधूक, राष्ट्रवादीतील वरिष्ठ नेत्यांच्या महत्त्वकांक्षा या सगळ्यांचा एकत्रित विचार केला तर अजित पवारांची राष्ट्रवादी फुटीच्या उंबरठ्यावर येऊन थांबलीय, असं म्हणायला बराच स्कोप उरतो…बाकी अजित पवार गटात फूट पडेल? आणि त्यामागे भाजप मास्टरमाइंड असेल? असं तुम्हालाही वाटतं का? तुमचं मत, प्रतिक्रीया आम्हाला कमेंट करुन नक्की कळवा,