हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींसह महाराष्ट्रातील ६ खासदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता असून यामध्ये भाजपचे ४, शिंदे गटाचे १ आणि रामदास आठवले अशा ६ जणांचा समावेश आहे. मात्र अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीच्या वाट्याला एकही मंत्रिपद आलेलं नाही. दादा गटाच्या कोणत्याही नेत्याला मंत्रिपदासाठी पंतप्रधान कार्यालयातून फोन आलेला नाही. त्यामुळे दादांची झोळी कि रिकामीच राहणार का? असा प्रश्न निर्माण झालाय.
अजित पवारांकडे सध्या २ खासदार आहेत. यातील सुनील तटकरे हे लोकसभेचे खासदार आहेत तर प्रफुल्ल पटेल हे राज्यसभेचे खासदार आहेत. प्रफुल्ल पटेल याना मंत्रिपद मिळेल अशी शक्यता होती. मात्र केंद्रीय मंत्रिपदासाठी सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांच्यात वाद असल्याच्या चर्चा आहेत, या दोन्ही नेत्यांनी मंत्रीपदासाठी आपआपला दावा केल्याची माहिती सूत्रांनी दिली. परंतु दोघांपैकी कोण? यासंदर्भात एकमत होऊ शकले नाही. आधी तुमच्यातील वाद मिटवा असं भाजपकडून सांगण्यात आल्याचे बोललं जातंय. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील एक गट छगन भुजबळांच्या मंत्रिपदासाठी आग्रही असल्याने या वादात आणखी भर पडण्याची शक्यता आहे.
हे सर्व वाद मिटवण्यासाठी आज सकाळी राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांची दिल्लीत तटकरे यांच्या निवासस्थानी बैठक झाली. या बैठकीला अजित पवार, सुनिल तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तब्बल दीड तास ही बैठक सुरु होती. दोन्ही नेत्यांनी वाद मिटवावा, यासाठी चर्चा झाली. परंतु शेवटपर्यंत तोडगा निघाला नाही. त्यामुळे दीड तासाच्या बैठकीनंतर अजित पवार, देवेंद्र फडणवीस बैठकीतून बाहेर निघाले. आता राष्ट्रवादीत पुढे आणखी काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष्य आहे.