शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवार गटाने घेतला मोठा निर्णय; महायुतीत खळबळ

shivaji maharaj statue ajit pawar

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा खाली कोसळल्यानंतर (Shivaji Maharaj Statue Fell Down) शिवप्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेनंतर राज्यातील राजकीय वातावरण सुद्धा गरम झालं असून विरोधात असलेली महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. महाविकास आघाडीकडून येत्या १ सप्टेंबर पासून जोडो मारो आंदोलन पुकारण्यात आलं आहे. मात्र एकीकडे विरोधक आक्रमक असतानाच आता महायुतीतील घटक असलेल्या अजित पवार गटानेही (Ajit Pawar Group) आपल्याच सरकारच्या विरोधात भूमिका घेत निषेध आंदोलन करणार आहे. त्यामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून ठाण्यात गुरुवारी निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. मालवणमधील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा दुर्घटनाग्रस्त झाला हे अत्यंत वेदनादायी अन् मनाला संताप आणणारे आहे. या दुर्घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी व भविष्यात अशा दुर्घटना घडू नयेत याची खबरदारी घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने गुरुवार, दिनांक २९ ऑगस्ट, २०२४ रोजी सकाळी ११.०० ते दुपारी १२ या वेळेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा, तलावपाळी, ठाणे येथे ‘मूक आंदोलन’ करण्यात येणार आहे, अशी भूमिका पक्षाकडून मांडण्यात आली आहे. तसेच अजित पवार गट राजकोट किल्ल्यावर जात मूक आंदोलन करणार आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी याबाबत पत्र काढलं आहे. महायुतीतील घटक पक्षानेच अशी भूमिका घेतल्याने भाजप आणि शिंदे गटाचं टेन्शन वाढलं आहे.

दरम्यान, शिवरायांचा पुतळा कोसळल्यानंतर अजित पवारांनी जाहीर सभेत महाराष्ट्रातील जनतेची जाहीर माफी सुद्धा मागितली. यामध्ये जे कोणी दोषी असतील त्यांच्या सर्वांच्या चौकशा केल्या जातील.पण मी राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून सांगतो. मी याबाबत महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो. छत्रपती शिवाजी महाराज हे आपल्या सर्वाचे दैवत आहेत. मात्र, त्यांचा पुतळा अशा प्रकारे कोसळणे हे सर्वांना धक्का बसणारे आहे. यामध्ये जे कोणी दोषी असतील मग ते कोणीही असूद्या. वरिष्ठ अधिकारी असुद्या किंवा कंत्राटदार असुद्या. त्या कंत्राटदाराला तर काळ्या यादीत टाकलं पाहिजे”, असं अजित पवार यांनी म्हटलं होते.