Ajit Pawar : अजितदादा सरकारमधून बाहेर पडणार? वर्षावरील बैठकीत मोठं काहीतरी घडलं

Ajit Pawar
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । पार्थ पवार जमीन घोटाळा प्रकरणावरून उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) गोत्यात आलेत. १८०० कोटींची महार वतनाची जमीन पार्थ पवार यांच्या कंपनीने अवघ्या ३०० कोटी रुपयांत खरेदी केली आणि २१ कोटींचा स्टॅम्प ड्युटी न भरता फक्त ५०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर हा सगळा व्यवहार झाल्याच्या आरोपांनी महाराष्ट्रात मोठी खळबळ उडाली. यानंतर हा व्यवहार रद्द करण्यात आल्याचे अजित पवारांनी म्हटले. मात्र, अजूनही पार्थ पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला नसल्याने विरोधकांकडून टीका केली जात आहे. विरोधकांकडून अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली जातेय. याच दरम्यान, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले अंबादास दानवे ?

पार्थ पवार यांच्यावरील जमीन घोटाळा आरोपानंतर मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी एक बैठक झाली. या बैठकीत अजित पवार हे आक्रमक झाले होते. वर्षावरील बैठकीत जे घडले त्यावर मला बोलायला वेळ मिळाला नाही. परंतु माझ्या माहितीप्रमाणे, त्यादिवशी जी बैठक झाली, त्यात अजित पवारांनी रागाने सरकारमधून बाहेर पडून बाहेरून सरकारला पाठिंबा देऊ इथपर्यंतची भूमिका घेतल्याचं आमच्या कानावर आले आहे. खरे खोटे बाहेर येईल. अजित पवारांच्या या भूमिकेमुळेच त्यांना आणि पार्थ पवारला या प्रकरणातून वाचवण्यात येतंय असा आरोप अंबादास दानवे यांनी केला आहे.

अजित दादांची फाईल तयार – Ajit Pawar

अंबादास दानवे पुढे म्हणाले, भाजपाला या संपूर्ण प्रकरणाची माहिती होती. हे सर्व उघड झाल्यानंतर अजित पवार अडचणीत येतील हा त्यांचा उद्देश होता. ही मोडस ओपरेंडी आहे. भारतीय जनता पार्टीनेच अडचणीत आणायचे.. भारतीय जनता पार्टीनेच बाहेर काढायचे हे काम या प्रकरणात करण्यात आलंय. आता अजित दादांची फाईल तयार केली आहे. उद्या जर अजित पवारांनी काही केले तर एक मिनिटांत पार्थ पवारांना अटक होऊ शकते असं अंबादास दानवे यांनी म्हंटल. पार्थ पवार काय लहान बाळ आहे का? ज्याने लोकसभा लढवली आहे आणि लोकसभा लढणारा माणूस काही बाळ नाहीये. कुणाचा मुलगा म्हणून त्याला वागणूक देऊ नये, भारताचा एक नागरिक म्हणून आणि गुन्हेगार म्हणून त्याला वागणूक दिली पाहिजे असेही मत अंबादास दानवे यांनी मांडलं.