Ajit Pawar On Ideology : भाजपसोबत असलो तरी विचारधारेशी तडजोड नाहीच; अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Ajit Pawar On Ideology

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । महायुतीमध्ये आम्ही भाजपसोबत असलो तरी धर्मनिरपेक्ष विचारधारेशी कोणतीही तडजोड करणार नाही अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar On Ideology) यांनी मांडली आहे. तसेच आम्ही फक्त विकासाच्या अजेंड्यावर महायुतीत सहभागी झालो आहोत असेही अजित पवार म्हणाले. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी विविध राजकीय विषयांवर रोखठोक भूमिका मांडली. तसेच महायुतीतील पक्षांसोबतच्या वैचारिक सुसंगततेबाबत वाढत्या प्रश्नांना अजित पवारांनी पूर्णविराम दिला.

विचारधारेशी अजिबात तडजोड नाही – Ajit Pawar On Ideology

अजित पवार म्हणाले, जेव्हा आम्ही युतीबाबत चर्चा सुरू केली त्याचवेळी स्पष्टपणे सांगितले की आमची विचारधारा ‘धर्मनिरपेक्ष’ आहे आणि आम्ही आमच्या विचारधारेशी अजिबात तडजोड करणार नाही. स्वतःचा बचाव करताना अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उदाहरण दिले, महाविकास आघाडीत सुद्धा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने शिवसेना सारख्या वेगळ्च्या विचाराच्या पक्षासोबत आघाडी केली होतीच या मुद्द्यावर जोर दिला. महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) स्थापनेवेळी धर्मनिरपेक्ष विचारसरणी आणि पुरोगामी विचार कुठे होता? असा सवाल सुद्धा अजित पवारांनी केला.

खरं तर शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली, अल्पसंख्याक, दलित आणि धर्मनिरपेक्ष मतदारांचा पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस ओळखला जात होता, मात्र अजित पवारांनी आता अधिक उजव्या विचारसरणीच्या पक्षांशी युती (Ajit Pawar On Ideology) केली आहे, ज्यामुळे काही निरीक्षकांनी पक्षाच्या वैचारिक सातत्यावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. याबाबत विचारलं असताना अजित पवारांनी २०१४ च्या विधानसभा निवडणुकीनंतरचा दाखला दिला. 2014 मध्ये महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला बाहेरून पॅथीमबा दिला होता, देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार बाहेरून पाठिंब्यामुळेच स्थापन झाले असं अजित पवारांनी म्हंटल.

महायुतीचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण?

महायुतीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल असा प्रश्न केला असता अजित पवारांनी सावध प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री नक्कीच महायुतीचा असेल, पण चेहरा ठरवणे ही सध्याची प्राथमिकता नाही असं अजित पवारांनी म्हंटल. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप हे गुणवत्तेच्या आधारावर होईल, ज्याठिकाणी ज्या पक्षाची ताकद जास्त असेल त्या पक्षाला जागा सुटेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष ६० किंवा त्यापेक्षा जास्त जागांवर उमेदवार उभे करेल अशी माहितीही अजित पवार यांनी दिली.