बारामतीतील पराभवानंतर अजित पवार स्पष्टच बोलले; कोणावर फोडलं खापर ?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बारामती लोकसभा निवडणुकीत (Baramati Lok Sabha 2024) सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवारांना पराभवाचा धक्का देत बारामती मधील आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलं. सुनेत्रा पवारांचा पराभव हा अजित पवारांसाठी मोठा धक्का मानला जातोय. त्यामुळे या पराभवानंतर अजित पवार (Ajit Pawar) नेमकं काय बोलणार?? कोणावर खापर फोडणार याकडे सर्वांचे लक्ष्य लागलं होते. अखेर दादांनी मौन सोडत अगदी स्पष्ट शब्दातच याविषयी भाष्य केलं. आतापर्यंत बारामतीकरांनी साथ दिली, पण यावेळच्या निकालाने मात्र मी आश्चर्यकारक झालो. आम्ही कुठेतरी कमी पडलो हे मान्यच करायला हवं असं अजितदादा म्हणाले.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अजित पवार म्हणाले, बारामतीबाबतच्या निकालावरून मी आश्चर्यचकित झालो. बारामतीकरांचा आजपर्यंत पाठिंबा मिळत होता. मात्र यंदा हा पाठिंबा का मिळाला नाही तेच कळत नाही. गेल्या अनेक वर्ष मी तिथे काम करतोय मात्र तरीही मला पाठिंबा मिळाला नाही. मुस्लिम समाज आमच्यापासून दूर झाला. संविधान बदलण्याचा विरोधकांनी प्रचार केला, त्याला मागासवर्गीय घटकाने पाठिंबा दिला. मागासवर्गीय समाजात तसा प्रचार बिंबवण्यात विरोधक यशस्वी झाले. त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही महत्त्वाचा ठरला. मराठवाड्यात संभाजीनगर सोडलं तर एकही जागा आली नाही असं म्हणत अजित पवारांनी पराभवाची कारणे सांगितली.

अजित पवार पुढे म्हणाले, शेवटी जनतेचा कौल असतो, तो कौल लोकशाहीत स्वीकारायचाच असतो. पुन्हा नाउमेद न होता लोकांसमोर जायचं असतं. मी कार्यकर्त्यांना नेहमीच सांगतो की, यश मिळालं म्हणून हुरळून जायचं नसतं तर किंवा अपयश मिळालं म्हणून खचून जायचं नसतं. त्यामुळे जनतेने दिलेला विनम्र कौल आम्ही स्वीकारलेला आहे. त्यांच्या आमच्याबद्दलचा जो विश्वास कमी झालेला आहे तो विश्वास पुन्हा संपादन करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करु आणि पुन्हा नव्या उमेदीने येणाऱ्या निवडणुकीत सामोरे जाऊ असं अजित पवार म्हणाले.