लाडकी बहीण योजनेबाबत अजित पवारांचं ट्विट चर्चेत; वित्त विभागाच्या आक्षेपानंतर काय म्हणाले?

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यातील महिलांचे आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी महायुती सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) सुरु केली आहे. या योजनेच्या माध्यमातून राज्यभरातील महिलांना दर महिन्याला १५०० रुपयांची आर्थिक मदत सरकार कडून करण्यात येणार आहे. येत्या १९ तारखेला या योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यात जमा होणार असून महिलावर्गात मोठ्या आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण आहे. मात्र वित्त विभागाने या योजनेवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याच्या बातम्या काल वाऱ्यासारख्या पसरल्या. त्यामुळे योजना सुरु राहणार कि बंद पडणार असा प्रश्न महिलाना पडला. यावर आज अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी स्पष्टपणे भूमिका मांडत वित्त विभागाचा या योजनेवर कोणताही आक्षेप नसल्याचे सांगितलं.

अजित पवारांनी ट्विट करत म्हंटल, महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री आणि राज्याचा अर्थ व नियोजन मंत्री म्हणून मी स्वतःच ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण’ योजना राज्याच्या वर्ष 2024-25 च्या अतिरिक्त अर्थसंकल्पात सादर केली आहे. वित्त व नियोजन, सर्व संबंधित विभाग तसेच राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतरच या योजनेची घोषणा मी राज्याच्या अर्थसंकल्पात केली. चालू आर्थिक वर्षात योजनेसाठी आवश्यक एकूण 35 हजार कोटी रुपयांच्या संपूर्ण रकमेची तरतूद यावर्षीच्याच अर्थसंकल्पात केली आहे. त्यामुळे या योजनेसाठी पैसा कुठून आणणार ?, हा प्रश्नच उद्भवत नाही. महाराष्ट्रासारख्या आर्थिक संपन्न राज्याला एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे.

राज्यातील माता-भगिनी-मुलींच्या आर्थिक स्वातंत्र्य, स्वावलंबन, पोषण व सर्वांगीण सक्षमीकरणासाठी, मान, सन्मान, स्वाभिमान वाढवण्यासाठी ही रक्कम खर्च करण्याची राज्य शासनाची तयारी आहे. त्यामुळे ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ला या राज्यातील कुणाचाही विरोध असण्याचे कारण नाही, असूच शकत नाही. काही प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या, या योजनेला वित्त विभागाचा विरोध असल्याच्या बातम्या कपोलकल्पित, वस्तुस्थितीशी, विसंगत, राजकीय हेतूने प्रेरित आहेत. प्रसार माध्यमांनी अशा बिनबुडाच्या बातम्या देणे कृपया थांबवावे. राज्यातील कुणाचाही अशा बातम्यांवर विश्वास बसणार नाही, याची मला खात्री आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या यशस्वीतेसाठी अधिकाधिक भगिनींना यात सहभागी करून घेण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करूया….