Maharashtra Budget 2025: महाराष्ट्रातील सार्वजनिक वाहतूक आणि रस्त्यांच्या क्षेत्रात ऐतिहासिक सुधारणा होणार आहेत. राज्यात येत्या पाच वर्षांत 237 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग सुरू होणार असल्याची महत्त्वाची घोषणा अजित पवार यांनी 2025-26 च्या राज्य अर्थसंकल्प सादर करताना केली.
अजित पवार यांनी सांगितले की, उत्तन ते विरार दरम्यान 55 किलोमीटर लांबीच्या सागरी सेतू आणि जोडरस्त्यांचा प्रकल्प 87 हजार 427 कोटी रुपयांच्या खर्चाने राबवला जाईल. पुणे ते शिरुर या 54 किलोमीटर लांबीच्या मार्गावर 7 हजार 515 कोटी रुपये खर्च करणार असून, तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्याच्या तळेगाव ते चाकण या 25 किलोमीटर लांबीसाठी 6 हजार 499 कोटी रुपये खर्च होईल.
पुणे, मुंबई आणि ठाणे मेट्रोचे विस्तारीकरण
अजित पवार यांनी सांगितले की, महानगरातील प्रवाशांसाठी वातानुकुलित मेट्रो सेवा कार्यान्वित केली जाईल. मुंबई आणि पुणे येथे 64 किमी मेट्रो मार्ग सुरू होणार आहेत. पुढील पाच वर्षांत 237 किमी मेट्रो मार्ग तयार होईल. तसेच, नागपूर मेट्रोच्या 40 किमी टप्प्याचे यशस्वी उद्घाटन झाले आहे. ठाणे आणि पुणे मेट्रोच्या विस्तारीकरणाला मंजुरी देण्यात आली आहे.
मुंबई-नवी मुंबई मेट्रो सेवा
आणखी एक महत्त्वाची घोषणा करत अजित पवार यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ ते नवी मुंबईतील विमानतळ जोडणारी मेट्रो सेवा लवकरच सुरू केली जाईल.
वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 6,500 कोटींचा प्रकल्प
पुणे जिल्ह्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी 6,500 कोटी रुपये खर्च करणार असल्याची घोषणा अजित पवार यांनी केली. पुणे ते शिरुर मार्गावर नव्या उन्नत रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल. आज सादर झालेल्या अर्थसंकल्पात सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते विकास क्षेत्रातील या मोठ्या घोषणा राज्यातील लोकांसाठी महत्वपूर्ण ठरतील.