हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । अजित पवार गटाचे जुन्नरचे आमदार अतुल बेनके (Atul Benke) यांनी आज शरद पवारांची (Sharad Pawar) भेट घेतली आहे. शरद पवार आज जुन्नर, खेड, आंबेगाव दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्या नारायणगाव येथील निवासस्थानी भेट दिली. यावेळी दादा गटात असलेले अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यामुळे चर्चाना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणूक अवघ्या ३ महिन्यांवर आली असताना अतुल बेनके शरद पवारांच्या भेटीला गेल्याने अजित पवारांना शरद पवार आणखी एक धक्का देणार का अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहेत.
शरद पवारांचे सूचक विधान –
अमोल कोल्हे यांच्या घरी अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतली. अतुल बेनके यांनी शरद पवारांची भेट घेतल्यानंतर पवारांनी केलेल विधान चर्चेत आलं आहे. अतुल बेनके यांचे वडील माझे मित्र होते. आमच्या मित्राचा तो मुलगा आहे. यामध्ये काही राजकारण होत असेल तर त्यावेळेला त्याचा निकाल देऊ , त्याची इथे चर्चा करण्याची गरज नाही. लोकसभा निवडणुकीत ज्यांनी आमच्या पक्षाचे काम केलं आहे ते आमचे आहेत. त्यांच्या हिताची जपणूक करण्याची जबाबदारी आमची असेल असं सूचक विधान शरद पवारांनी केलं. त्यामुळे शिरूर लोकसभा निवडणुकीत अतुल बेनके यांनी पवार गटाच्या अमोल कोल्हे यांचं काम केलं का? असा प्रश्न राजकीय वर्तुळात निर्माण झाला आहे.
मी दादांसोबत- अतुल बेनके
दरम्यान, शरद पवारांच्या भेटीनंतर अतुल बेनके यांनी प्रसारमाध्यांशी बोलत प्रतिक्रिया दिली. शरद पवार हे ज्येष्ठ नेते आहेत. ते आमच्यासाठी दैवत आहेत. गेल्या 40 वर्षांचा बेनके परिवाराचा राजकीय इतिहास हा शरदचंद्र पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील यांच्या आशीर्वादाने चालू राहिलेला आहे. सध्या राजकीय स्थित्यंतरं झाली. सहा महिन्यांच्या तटस्थतेच्या भूमिकेनंतर आता जुन्नर तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीकोनातून एक जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून अजित पवार यांच्यासोबत राहणं पसंत करेन असं अतुल बेनके यांनी स्पष्ट केलं तसेच माझ्या या भेटीचा कोणताही राजकीय अर्थ काढण्याची गरज नाही असेही त्यांनी सांगितलं.