हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन| समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव (Akhilesh Yadav) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) राज्याभिषेक सोहळ्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे राजकीय वाद निर्माण झाला आहे. या विधानावरून भाजपने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मंत्री जयकुमार रावल (Jaykumar Rawal) यांनी यादव यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
जयकुमार रावल यांचा हल्लाबोल
News18 इंडियाच्या डायमंड स्टेट्स समिट दरम्यान जयकुमार रावल यांनी अखिलेश यादव यांच्या विधानाचा तीव्र शब्दांत समाचार घेतला. ते म्हणाले की, “समाजवादी पक्षाचे नेते इतिहासाची मोडतोड करत आहेत. राजकीय फायद्यासाठी महापुरुषांबद्दल चुकीची माहिती पसरवणे हे अत्यंत वेदनादायी आहे. यातून लाखो नागरिकांच्या भावना दुखावल्या जात आहेत,”
त्याचबरोबर, “अखिलेश यादव यांनी तात्काळ माफी मागावी. त्यांच्या चुकीच्या विधानामुळे जनतेच्या भावना दुखावल्या आहेत, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई झाली पाहिजे.” अशी मागणी त्यांनी केली आहे.
अखिलेश यादव काय म्हणाले होते?
अखिलेश यादव यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकासंदर्भात बोलताना म्हटले होते की, “शिवाजी महाराजांचा तिलक त्यांच्या पायाच्या अंगठ्याने करण्यात आला होता.” या विधानावरून महाराष्ट्रात तीव्र संताप व्यक्त होत आहे. त्यामुळेच भाजपसह अनेक नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतला आहे. भाजपने या वक्तव्यावर प्रतिक्रिया देत म्हटले आहे की, “इतिहासाच्या चुकीच्या मांडणीमागे एक ठरवून केलेले षडयंत्र आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे देशाच्या अस्मितेचे प्रतीक आहेत. अशा प्रकारची छेडछाड भाजप कदापी सहन करणार नाही.”
दरम्यान, अखिलेश यादव यांच्या या विधानाबाबत बोलताना जयकुमार रावल यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “इतिहास हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. राजकारणात पराभव आणि विजय होत राहतात, पण त्याचा अर्थ महापुरुषांचा अपमान करणे असा होत नाही.” त्यामुळे “इतिहासाशी छेडछाड करणाऱ्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे,” अशी मागणी त्यांनी केली आहे.
महत्वाचे म्हणजे, या संपूर्ण प्रकरणात अद्याप अखिलेश यादव यांनी कोणतेही अधिकृत स्पष्टीकरण दिलेले नाही. मात्र, त्यांच्या विधानावर महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. त्यामुळे अखिलेश यादव आपण केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागतील का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.