फटाक्यांची अतिषबाजी : अकलूज-माळेवाडी नगरपरिषद तर नातेपुते नगरपंचायतीचा राज्य सरकारचा अध्यादेश

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर | अकलूज-माळेवाडी नगरपरिषद व नातेपुते येथे नगरपंचायत स्थापन करण्याची अधिसूचना राज्य सरकारचे उपसचिव सतीश मोघे यांनी राज्यपालांच्या सहीनिशी काढली आहे. दरम्यान, तीन आठवड्यात याबाबत अध्यादेश काढावा, असे आदेश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला 17 जुलै रोजी दिले होते. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या अकलूज-माळेवाडी व नातेपुते ग्रामस्थांच्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे. याबाबत 19 सप्टेंबर 2019 रोजी पहिला अध्यादेश निघाला होता. त्यानंतर राज्यात सत्तापरिवर्तन झाले व अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगर पंचायतीचा प्रश्न प्रलंबित राहिला होता. अकलूज व नातेपुते ग्रामपंचायतीच्या वतीने ऍड. अभिजित कुलकर्णी यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याला मंगळवारी न्याय मिळाला.

हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी गेली 43 दिवस अकलूज येथे प्रांताधिकारी कार्यालयासमोर चक्री उपोषण सुरू होते. अकलूज नगरपरिषद व नातेपुते नगर पंचायतीबाबत अंतिम अधिसूचना निघाल्याचे वृत्त वाऱ्यासारखे पसरताच अकलूज, नातेपुते, माळेवाडी येथे फटाक्‍यांची आतषबाजी करण्यात आली. नेतेमंडळींनी एकमेकांना फोन करून शुभेच्छा दिल्या. भावी नगरसेवक, नगराध्यक्ष आणि त्यांचे समर्थक फटाक्‍यांची आतषबाजी करीत आहेत. माळशिरसचे तहसीलदार जगदीश निंबाळकर यांना आज (बुधवारी) या तिन्ही ग्रामपंचायतींची सूत्रे देण्याचे आदेशात म्हटले आहे. त्यामुळे विद्यमान सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना फक्त सहा महिने काम करण्यास मिळाले आहेत. आता नगरपरिषद, नगरपंचायतीसाठी नव्याने प्रभाग रचना होऊन निवडणूक कार्यकम जाहीर होईल. एकूणच, माळशिरस तालुक्‍यात राज्य शासनाच्या या अधिसूचनेमुळे आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

शिवसेनेचे शिष्टमंडळ मुंबईत तळ ठोकून

अकलूज-माळेवाडी नगरपरिषद आणि नातेपुते नगरपंचायत होण्यासाठी शिवसेनेचे शिष्टमंडळ मागील तीन दिवसांपासून मुंबईत तळ ठोकून आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना भेटून सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री ठाकरे यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना हा प्रश्न मार्गी लावण्याच्या सूचना दिल्या आणि तसे पत्र शिष्टमंडळास नगर विकास मंत्री यांनी दिले. या शिष्टमंडळात शिवसेनेचे धनंजय डिकोळे, संभाजी शिंदे, पुरुषोत्तम बरडे, गणेश वानकर, दत्ता पवार, नामदेव वाघमारे, प्रमोद अण्णा कुलकर्णी यांचा समावेश होता. मंगळवारी सायंकाळी नगर परिषद व नगरपंचायतीचे पत्र दिल्यानंतर त्यांनी मुख्यमंत्री आणि नगर विकास मंत्र्यांचे आभार मानले.