Akola Lok Sabha Election 2024 : प्रत्येक लोकसभा मतदारसंघाची आपली स्पेशल अशी एक आयडेंटिटी असते. अकोल्याबद्दल बोलायचं झालं तर वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या उमेदवारीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात ठळकपणे उठून दिसणारा हा मतदारसंघ. तसं पाहायला गेलं तर मागील चारही लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांचं मोठ्या लीडनं पानिपत झालय. भाजपचे संजय मामा धोत्रे सलग चार वेळा या मतदारसंघातून खासदारकीवर कायम आहेत. इतकंच काय तर मोदी सरकारच्या दुसऱ्या मंत्रिमंडळात धोत्रेंच्या वाट्याला कॅबिनेट राज्यमंत्रीपदही आलं. 1998, 1999 चा अपवाद वगळता या मतदार संघावर भाजपचा वट आहे. काँग्रेसच्या सहकार्याने दोनदा खासदार झालेल्या आंबेडकरांना त्यानंतर मात्र मत विभाजनाचा फटका बसत आलाय.
सध्या विद्यमान खासदार संजय धोत्रे हे आजाराने त्रस्त असल्यामुळे नक्की उमेदवारी कुणाला द्यायची? असा पेच भाजप समोर असताना आता प्रकाश आंबेडकरांच्या खासदारकीच्या आशा पुन्हा पल्लवीत झाल्या आहेत. फक्त प्रश्न उरतो ते एकट्यानं या निवडणुकीला सामोरे जाणार की महाविकास आघाडीच्या सहाय्याने ते अकोल्याचा गड पुन्हा खेचून आणणार. अकोला लोकसभेच्या स्थानिक राजकारणाचा आणि ग्राउंड रियालिटीचा हा घेतलेला माहितीपूर्ण आढावा…आधी काँग्रेसचा एकहाती वर्चस्व असणारा अकोला लोकसभा मतदारसंघ 1989 नंतर भाजपकडे झुकला तो कायमचाच! प्रकाश आंबेडकरांचे दोन विजय वगळता या मतदारसंघावर कायम भाजपचाच झेंडा फडकत राहिलाय. ..
संजय धोत्रे यांच्या रूपानं भाजप या मतदारसंघातून सलग चौथ्यांदा निवडून आलाय.असं असलं तरी या मतदारसंघात काँग्रेसला आणि वंचित बहुजन आघाडीला हक्काची व्होट बँक आहे. मात्र मत विभाजनाचा फटका बसून प्रत्येक वेळेस भाजपचेच पारड अकोल्यातून जड होताना पाहायला मिळतं. वंचितचा महाविकास आघाडी (Maha Vikas Aghadi) सोबत सूर जुळला तर प्रकाश आंबेडकर अकोल्यातून आरामशीर निवडून येतील असे चित्र आहे. मात्र याच वंचितला आघाडीत सामावून घेण्याचा खेळ काही अजूनही निष्कर्षापर्यंत जाऊन पोहोचलेला नाहीये. मात्र महाविकास आघाडीकडून वंचित बहुजन आघाडीला ४-५ जागा सोडण्यात येऊ शकतात अशी चर्चा आहे. आणि या जागांमध्ये अकोल्याचा समावेश असणार हे नक्की…
2019 लोकसभेची आकडेवारी काय सांगते ? Akola Lok Sabha Election 2024
शिवसेना खासदार संजय राऊतांकडून प्रकाश आंबेडकरांच्या नावावर याआधीच शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीचे निकाल बघितले तर महाविकास आघाडीच्या सोबत राहिले तरच प्रकाश आंबेडकर लोकसभेला विजयी होण्याची शक्यता आहे. मागील निवडणुकीत भाजपच्या संजयमामा धोत्रे याना 554444 मते मिळाली होती. त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या प्रकाश आंबेडकर याना 278848 मते आणि काँग्रेसच्या हिदायतुल्ला बरकतुल्ला पटेल यांच्या पारड्यात 254370 मते मिळाली होती. म्हणजेच जर वंचित + काँग्रेस मतांची बेरीज केलयास प्रकाश आंबेडकर यांच्या विजयाचा Akola (Lok Sabha Election 2024) मार्ग सुकर होताना दिसत आहे.