Akshay Shinde Encounter : आव्हाडांना वेगळीच शंका!! म्हणाले, अक्षयला शाळेतील काही गुपितं….

Akshay Shinde Encounter jitendra awhad
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । बदलापूर बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या गोळीबारात एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) झाला आहे. पोलिसांनी स्वरक्षणासाठी केलेल्या गोळीबारात अक्षय शिंदेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिस त्याला तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात होते, तेव्हा त्याने पोलिसांकडील बंदूक हिसकावून घेतली आणि पोलिसांवर गोळीबार केल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. या चकमकीत अक्षय शिंदेंचा एन्काऊंटर झाला. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मात्र वेगळीच शंका उपस्थित केली आहे.विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाही मात्र अक्षय शिंदेचा एन्काऊंटर हा संशयास्पद आहे असं आव्हाडांनी म्हंटल. एवढच नव्हे तरं अक्षयला शाळेतील काही गुपितं माहीत होती का? असं म्हणत शाळेची व संस्थेबद्दलची माहिती दडपण्याचा हा प्रयत्न आहे असा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केलाय.

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत म्हंटल, बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणात आधीच 3 गोष्टी घडल्या.

  1. FIR दाखल करण्यात व अटक करण्यात उशीर
  2. पोलिसांवर दबाव
  3. शाळा व संस्थाचालकांची ओळख लपवण्याचा प्रयत्न

हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो- Akshay Shinde Encounter

“या सगळ्यानंतर आज अक्षय शिंदे या आरोपीचा झालेला एन्काऊंटर हा संशयास्पद आहे, हे स्पष्ट आहे. शिंदेला शाळेतील काही गुपितं माहीत होती का? असा प्रश्न इथे उपस्थित होतो. यावरूनच शाळेची व संस्थेबद्दलची माहिती दडपण्याचा हा प्रयत्न आहे,” असा आरोप आव्हाडांनी केला आहे. “हातात असलेल्या आरोपीचा एन्काऊंटर कधी होत नसतो. या अशा घटना फक्त युपी-बिहारमध्ये होतात. महाराष्ट्र हे कायद्याने चालणारं राज्य आहे, त्याचा युपी-बिहार करू नका,” असं आव्हाड यांनी म्हटलं आहे.

जितेंद्र आव्हाड पुढे म्हणाले, विरोधक म्हणून आम्ही काही आरोपीचा बचाव करत नाही. आम्हालाही हेच वाटतं, की या अक्षम्य व घृणास्पद कृत्यासाठी गुन्हेगाराला फाशीच व्हायला हवी. पण हे एन्काऊंटरसारखे स्टंट अत्यंत चुकीचे आहेत. ही काही हुकूमशाही नाहीये, की राज्याच्या प्रमुखाच्या मनात आलं म्हणून कोणाचा तरी एन्काऊंटर (Akshay Shinde Encounter) केला. ही लोकशाही आहे. यात न्यायपालिकाच गुन्हेगाराला शिक्षा आणि पीडितांना न्याय देते. कायद्याप्रमाणे फाशीही देता येतेच. सरकारने जलदगती न्यायालय आणि त्याची योग्य प्रक्रिया पार पाडली असती, तर 90 दिवसांत सुद्धा फाशीची शिक्षा सुनावली गेली असती. पण या प्रकरणाच्या बाबतीत पॉलिटीकल हिरोइजम आणि जवळच्या माणसाला वाचवण्याच्या प्रयत्नातच सरकार सुरुवातीपासून आहे,” असा आरोपही आव्हाडांनी केला आहे. “महाराष्ट्रातील जनता हे असे स्टंट चांगली ओळखून आहे. ते ही कायदेहीन संस्कृती सहन करणार नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी आपल्या पोस्ट मध्ये म्हंटल.

दुसरीकडे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही सरकारला ३ सवाल केले आहेत. बदलापूर अत्याचार प्रकरणातील शाळेच्या विश्वस्तांना अद्याप अटक झालेली नाही, ते फरार आहेत त्यांना अद्याप अटक का होऊ शकत नाही? फरार आरोपींना वाचवण्यासाठी या प्रकरणातील मुख्य आरोपीचे एन्काऊंटर करून प्रकरण संपवण्याचा प्रयत्न आहे का? हे संपूर्ण प्रकरण दाबण्याचा वरिष्ठ पातळीवरच्या प्रयत्नांचा भाग म्हणून पोलिसांमार्फत आरोपीचे एन्काऊंटर केले आहे का? असा सवाल करत या प्रकरणाचे सत्य समोर येण्यासाठी उच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायमूर्तींमार्फत चौकशी करावी अशी मागणी नाना पटोले यांनी केली आहे.