कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
गेल्या काही दिवसात मुसळधार झालेल्या पावसाने कोयना धरण क्षेत्रात पाणीपातळी वाढल्याने कोयना नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला होता. अखेर आज बुधवारी सकाळी दि. 4 रोजी 9 वाजता कोयना धरणातून सर्व वक्री दरवाजे 13 दिवसांनी बंद केल्याने पाण्याचा विसर्ग बंद झाला आहे. धरणक्षेत्रासह जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने धरणाचे सर्व 6 दरवाजे बंद करण्यात आल्याची माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
सातारा जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसात मुसळधार पावासाने हजेरी लावली. या पावसाने काही तासातच धरण व्यवस्थापनाने धरणातून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेतला. पाण्याचे नियमन करण्यासाठी पाणी सोडताना पावसाचे प्रमाण वाढल्याने वेळोवेळी निर्णय बदलावे लागले. शुक्रवारी 23 जुलै 2021 रोजी सकाळी 8 वाजता सहा दरवाज्यातून 10 हजार क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तर त्याच दिवशी दिवसभरात पाण्याचा विसर्ग 10 हजार क्युसेस वरून सायंकाळपर्यंत 53 हजार क्युसेस करण्यात आला होता.
कोयना धरणक्षेत्र तसेच जिल्ह्यातील अनेक भागात कोसळणाऱ्या पावसाने कोयना, कृष्णा नदीकाठच्या गावात पूरस्थिती निर्माण झालेली होती. सध्या कोयना धरण क्षेत्रात पावसाची रिमझिम सुरू असून 20 हजार 440 पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे केवळ पायथा गृहातून 2100 क्युसेस पाणी सोडण्यात येत आहे. कोयना धरण क्षेत्रात बुधवारी सकाळी 9 वाजता 85. 88 पाणीसाठा शिल्लक आहे.