औरंगाबाद : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुणांवर उपचार करण्यासाठी सर्व आवश्यक साधनसामग्री उपलब्ध करुन देण्यात आली असून त्याचाच एक भाग म्हणून लिक्वीड ऑक्सीजनसाठा जिल्ह्यात मुबलक उपलब्ध आहे. परंतु भविष्यातील परिस्थितीचा विचार करुन आत्ताच नियोजन करणे गरजेचे असल्याने सर्व रुग्णालयांनी ऑक्सीजनचा सुयोग्य वापर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कोरोनाच्या निदानासाठी करण्यात येत असलेल्या रेमीडिसीवीर इंजेक्शन व ऑक्सीजनचा सुयोग्य वापरासंदर्भात लोकप्रतिनिधीची आढावा बैठकीत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर बोलत होते. यावेळी खासदार डॉ. भागवत कराड, इम्तियाज जलील, आ. हरीभाऊ बागडे, आ. अतुल सावे, आ. संजय शिरसाठ, आ. प्रदीप जैस्वाल, आ. अंबादास दानवे, आ. रमेश बोरनारे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा मिनाताई शेळके, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस आयुक्त निखील गुप्ता, मनपा आयुक्त आस्तिककुमार पांडेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले यांच्यासह सर्व संबंधीत अधिकारी उपस्थित होते.
विभागीय आयुक्त यांनी कोरोनाबाधितांच्या उपचारासाठी सर्वच रुग्णांना ऑक्सीजनची आवश्यकता नसते त्यामुळे ऑक्सीजनची गरज असणाऱ्या रुग्णांनांच ऑक्सीजन लावण्यात यावा तसेच ऑक्सीजन वापरतांना अनावश्यक वापर, ऑक्सीजन गळती इत्यादी बाबीचा जाणिवपुर्वक विचार करावा. तरच भविष्यातील ऑक्सीजनची वाढती मागणीला आळा घालणे शक्य होईल असे निर्देशित करुन केंद्रेकर म्हणाले की, 30 पेक्षा जास्त खाटा असणाऱ्या खाजगी रुग्णांलयांनी देखील ऑक्सीजन करीता केवळ प्रशासनावर अवंलबून न राहता स्वत: रुगणालयात ऑक्सीजन प्लान्ट तत्काळ उभारावा याकरीता मनपा आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली यांचे मॉनीटरींग करण्यात यावे जेणे करुन ऑक्सीजनचा मुबलक साठा उपलब्ध होईल. त्याचबरोबर रेमीडिसीवर इंजेक्शनला पर्यायी उपलब्ध असणाऱ्या (Toclizumab) इंजेक्शनचा वापर करावा.
तसेच खाजगी सर्व रुग्णालयांच्या प्रत्येक बिलाचे स्वतंत्र ऑडीट करण्यात येणार असून त्या रुग्णालयांनी लेखा परिक्षकाचे नाव, संपर्क क्रमांक, रुग्णालय परिसरात दर्शनी स्थळी लावावी. अन्यथा दोषी रुग्णालयांवर तात्काळ गुन्हा दाखल करण्याच्या सूचना दिल्या तसेच वैजापूर येथील शासकीय रुग्णालयामध्ये तत्काळ फिजिशीयन उपलब्ध करुन देण्याचे संबंधितांना निर्देशित केले.
संबंधितांना दिल्या. यावेळी खा. डॉ. भागवत कराड आपल्या जिल्ह्यातील उपलब्ध ऑक्सीजन इतर जिल्ह्यात निर्यात करु नये, याबाबत आग्रही भूमिका मांडली. तसेच खा. इम्तियाज जलील यांनी रेमडिसीवर इंजेक्शनच्या अधिक साठ्याबाबत विचारणा केली. आ. हरीभाऊ बागडे आणि आ. अतुल सावे यांनी ऑक्सीजनची आवश्यकता असणाऱ्या रुग्णांनाच रेमडिसीवर देण्यात यावे, असे निर्देशित केले. खाजगी रुग्णालयात अवाजवी बील आकारण्यात येत असून त्यावर त्वरीत निर्बंध घालण्याची मागणी आ. संजय शिरसाठ यांनी केली. रेमडिसीवर इंजेक्शन हे जिल्हाधिकाऱ्यांच्या निगराणीखाली वितरीत करण्यात याव्यात अशा सूचना आ. अंबादास दानवे यांनी केल्या.
सर्व आमदारांनी ऑक्सीजनचा वापर हा आरोग्यसाठीच करण्यात यावा, तसेच रेमीडिसीवरचा मुबलक साठा, खाजगी रुग्णालयाच्या बिलाचे ऑडीट करणे, या प्रमुख मागण्या सर्वानुमतांनी केल्या.
जिल्हाधिकारी सुनील चव्हाण म्हणाले की, ब्रेक दि चेंन व्दारे जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर काही अंशी कमी होत असून कॉन्टेक्ट ट्रेसींगमुळे सौम्य लक्षणे असणारे रुग्ण कमी कालावधीत बरे होत आहे. जिल्ह्यात 61 KL लिक्वीड ऑक्सीजन उपलब्ध असल्याने सध्यातरी ऑक्सीजनची कमतरता नाही. त्याचबरोबर रेमीडिसीवीर इंजेक्शन साठा देखील जिल्ह्यात 6 हजार इतका आहे. मुबलक बेड जिल्ह्यात उपलब्ध असून 1 हजार ICU बेडदेखील उपलब्ध आहेत. शहरात दररोज 6 हजार तपासण्या करण्यात येत असून आणखी दोन नव्या मशिन देखील उपलब्ध झाल्या आहेत. शहरात 26 तर ग्रामीण भागात 78 कन्टेटमेंट झोन असून कॉन्टॅन्क्ट स्ट्रेसिंगचे शहरात 25% तर ग्रामीण भागात 16% इतके प्रमाण असल्याची माहिती यावेळी चव्हाण यांनी दिली.