सांगली प्रतिनिधी । प्रथमेश गोंधळे
प्रकाश शिक्षण कामगार युनियनने प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर मधील कोरोना योध्दावर पालकमंत्री जयंत पाटील यांच्या दबावाला बळी पडुन दाखल केलेले गुन्हे मागे घ्यावेत. यासाठी शहरातील आष्टा नाका परीसरातील लोकनेते राजारामबापु पुतळ्यासमोर आत्मक्लेश आंदोलन केले. यावेळी राष्ट्रीय काँग्रेस पक्ष, शिवसेना, रासप, आरपीआय, स्वाभिमानी शेतकरी संघटना या पक्षांनी पाठींबा दर्शवत पोलिस व आरोग्य अधिकार्यांच्या बेकायदेशीर कारभाराचा पंचनामा केला.
सर्व पक्षाच्या पदाधिकार्यांनी पालकमंत्री जयंत पाटील, पोलिस व आरोग्य अधिकारी यांच्या हुकुमशाहीचा व बेकायदेशीर कारवाई बाबत निषेध नोंदविला. प्रकाश हॉस्पिटल अॅण्ड रिसर्च सेंटर मधील डॉक्टर व सहकारी स्टाफवर राजकीय व्देषातुन पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हुकुमशाहीला बळी पडुन पोलिस व आरोग्य अधिकारी चौकशीचा फार्स करुन खोटे गुन्हे दाखल करीत आहे.
तक्रार दाखल करणारे जयंत पाटील यांचे समर्थक आहेत. हे खोटे गुन्हे मागे घ्यावेत व कोरोना योध्दांना न्याय द्यावा या मागणीसाठी प्रकाश कामगार युनियनच्या वतीने आत्मक्लेश आंदोलन केले. प्रकाश शिक्षण कामगारांनी लोकनेते राजारामबापु पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी आम्ही कोरोना योध्दा, आम्हाला न्याय द्या, राजकीय हुकुमशाहीचा धिक्कार असो, पोलिस व आरोग्य प्रशासनाचा धिक्कार असो अशा घोषणा देऊन अन्यायी कारवाई विरोधात आक्रोश केला.