हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| सिम वापरकर्त्यांसाठी नवीन वर्षाच्या निमित्ताने एक महत्त्वाची बातमी आली आहे. आता 1 जानेवारी 2024 पासून नवीन सिम कार्ड खरेदीचे नियम बदलणार आहेत. बदलत्या नियमानुसार कोणत्याही व्यक्तीला सहज सिम कार्ड खरेदी करता येऊ शकणार नाही. आता सर्व गोष्टींची पडताळणी झाल्यानंतरच सिम कार्ड खरेदी करता येणार आहे.
50 लाखांचा दंड आणि कारावासाची शिक्षा
2023 वर्षात स्कॅम, स्पॅम, फ्रॉड, ऑनलाइन फसवणुकीचे अनेक प्रकार घडले. या प्रकारांवर आता नवीन वर्षात आळा बसण्यासाठी सरकारने ठोस पाऊल उचलले आहे. नुकतेच सरकारने नवीन टेलिकम्युनिकेशन विधेयक सादर केले आहे. या विधेयकानुसार एक जानेवारी 2024 पासून सिम कार्ड खरेदी संदर्भात नवीन नियम लागू होणार आहेत. या नवीन नियमानुसार कोणी बनावट कागदपत्रांद्वारे किंवा बनावट माहिती देऊन नवीन सिम कार्ड खरेदी केले तर त्याला तीन वर्षांचा कारावास आणि 50 लाख रुपयांचा दंड होणार आहे.
हे आहेत नविन नियम
त्याचबरोबर 1 जानेवारी 2024 पासून केवळ डिजिटल केवायसीच्या माध्यमातूनच नवीन सिम खरेदी करता येणार आहे. याबरोबर सर्व सिम व्हेंडर्सना व्हेरिफिकेशन अनिवार्य असणार आहे. तसेच नव्या वर्षामध्ये कोणालाही बल्क सिमकार्ड्स मिळणार नाहीत. मात्र हा नियम व्यावसायिक कारणांसाठी लागू असेल. तर सिम खरेदी आणि विक्रीसाठी, टेलिकॉम फ्रँचाइझी, सिम डिस्ट्रिब्युटर्स आणि पॉईंट ऑफ सेल एजंटला रजिस्ट्रेशन बंधनकारक असणार आहे. हा नियम मोडल्यास त्या व्यक्तीला दहा लाखांचा दंड ठोठावण्यात येईल.
त्याचबरोबर टेली कम्युनिकेशन विधेयकानुसार, नवीन सीम खरेदी करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा डेटा बायोमेट्रिक पद्धतीने कलेक्ट करणं दुकानदाराला बंधनकारक असणार आहे. तसेच एखादा व्यक्ती बनावट माहिती देऊन सिम खरेदी करत असेल तर त्यावर देखील कठोर कारवाई केले जाणार आहे. तर खोट्या पद्धतीने सिम विकणाऱ्या दुकानदारांवर देखील कारवाई करण्यात येणार आहे.