Monday, March 20, 2023

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी ऑफलाईन पद्धतीनेही अर्ज भरण्याची परवानगी

- Advertisement -

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राज्यभरातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. निवडणूक आयोगानं ग्रामपंचायत निवडणुकीचे अर्ज ऑफलाईन भरण्याची परवानगी दिली आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्यामुळे निवडणूक आयोगाने ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे.

एकाच वेळी अनेक उमेदवार ऑनलाइन पद्धतीने अर्ज भरत असल्याने आयोगाच्या वेबसाइटवरून अर्ज भरण्यात तांत्रिक अडचणी येत आहेत. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवारांचे अर्ज खोळंबले आणि गोंधळ उडाला . या सर्व पार्श्वभूमीवर ऑफलाईन अर्ज भरण्याची मागणी राज्यभरातून करण्यात येत होती. अखेर राज्य निवडणूक आयोगाने यासंबंधीची महत्त्वाची घोषणा केली आहे. तसेच नामनिर्देशनपत्र सादर करण्याची मुदत 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत वाढवण्यात आली आहे.

- Advertisement -

राज्य निवडणूक आयोगाने 9 नोव्हेंबर 2022 रोजी राज्यातील 7 हजार 751 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यानुसार दिनांक 28 नोव्हेंबर 2022 ते 2 डिसेंबर 2022 (दुपारी 3 वाजेपर्यंत) या वेळेत ऑनलाईन पद्धतीने नामनिर्देशनत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र आता त्यामध्ये थोडी दुरुस्ती करून नामनिर्देशनपत्र ऑफलाईन पद्धतीने 2 डिसेंबर 2022 रोजी सायंकाळी 5.30 पर्यंत सादर करता येतील,अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू.पी. एस. मदान यांनी दिली आहे.