सातारा प्रतिनिधी | शुभम बोडके
सातारा जिल्ह्यातील 10 तालुक्यांमध्ये जनावरांना लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात उद्भवलेल्या गाय आणि बैल वर्गीय पशुधनातील लम्पी चर्मरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी 7 सप्टेंबरपासून जनावरांच्या वाहतुकीवर, बाजार भरवण्यावर आणि शर्यतीवर बंदी घातली आहे. बैलगाडा प्रेमी आणि आयोजकांनी लसीकरण झालेल्या बैलांना बैलगाडा शर्यतीमध्ये भाग घेण्यासाठी परवानगीची मागणी केली आहे.
बैलांना रोज फेरी मारणे तसेच स्पर्धेमध्ये पळवणे हे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे बैल या सगळ्या गोष्टी विसरून जाऊ शकतात आणि त्या बैलाची किंमत कमी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन लसीकरण झालेल्या जनावरांना या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी पात्र करून काही अटी, शर्ती घालून परवानगी द्यावी अशी मागणी बैलगाडा प्रेमी करत आहेत.
सातारा जिल्ह्यात कालपर्यंत 87 जनावरांचा मूत्यू झाला असून हजारांच्यावर बाधित जनावरांची संख्या आहे. अशा परिस्थितीत जिल्हाधिकारी बैलगाडा शर्यंतींना परवानी देणार का याकडे बैल मालकांसह शाैकिंनांचे लक्ष लागून राहिले आहे.