आंबेडकरांची वंचित लोकसभा हरली असली तरी हवं होतं ते मिळवलंच

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । 2019 ला भाजपची बी टीम म्हणून आरोप झालेल्या वंचितनं (Vanchit Bahujan Aghadi) काँग्रेस राष्ट्रवादीचा बारा ते पंधरा जागांवर गेम केला होता…त्यामुळे 2024 ला महाविकास आघाडी सोबत जागा वाटपाची बोलणी फिस्कटल्यानंतर वंचित स्वतंत्र मैदानात उतरली…तेव्हा पुन्हा एकदा वंचित इफेक्ट महाविकास आघाडीला तोट्यात घेऊन जाईल, असा अंदाज असताना निकाल एकदम उलटा लागला…वंचितच्या 38 पैकी तब्बल 36 उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं…प्रकाश आंबेडकरही या लोकसभेला दारून पराभूत झाले…त्यामुळे वंचित इफेक्ट यंदाच्या लोकसभेला सपशेल तोंडावर आपटला…वंचितचा प्रभाव संपलाय, आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) राजकारण थांबवावं…अशा चर्चे नाही पेव फुटले… पण वंचित जरी लोकसभेला हरली असली तरी त्यांना जे काही साध्य करायचं होतं, ते त्यांनी निकालात करून दाखवलय…होय आम्ही बोलतोय ते खरंय…स्वतः प्रकाश आंबेडकर यांनी वंचितमुळे भाजपचे उमेदवार पडले असल्याचा खळबळजनक दावा केलाय…पण खरंच फॅक्चुअल डेटा चा विचार करता वंचितनं लोकसभेच्या निवडणुकीत कोणाला पाडलं? आणि कोणाला निवडून आणलं? निवडणूक हरूनही वंचित लोकसभा जिंकली, असं आम्ही का म्हणतोय? त्याचाच हा स्पेशल रिपोर्ट…

थोडसं तपशिलात जायचं म्हटलं तर वंचितनं तब्बल 6 जागांवर विजयी उमेदवाराच्या नीट पेक्षा अधिकची मतं घेतली…अर्थात वंचितमुळे काही ठिकाणी महाविकास आघाडीचे तर काही ठिकाणी महायुतीचे उमेदवार निवडून आले… वंचितने महायुतीचा पाडलेला पहिला उमेदवार आहे तो नांदेडचा… भाजपच्या ताब्यात असणार नांदेडचं घोडे मैदान मारलं ते काँग्रेसच्या वसंत चव्हाण यांनी…भाजपचे विद्यमान खासदार प्रतापराव चिखलीकर यांचा चव्हाणांनी तब्बल 59 हजार 442 मतांनी पराभव केला… पण इथे इंपॉर्टन्ट ठरला तो वंचित फॅक्टर…कारण इथून वंचितच्या अविनाश भोसीकर यांनी तब्बल 92 हजार 512 मते घेतली… भोसीकर हे लिंगायत समाजातून येत असल्याने भाजपची ही पारंपारिक वोट बँक वंचितकडे शिफ्ट झाली…विजयातल्या मार्जिनची महत्त्वाची मतं आपल्याकडे घेतल्याने भाजपच्या तगड्या उमेदवाराचा इथून पराभव झाला…

YouTube video player

वंचितनं गेम केलेला महायुतीचा दुसरा उमेदवार आहे तो हिंगोलीचा…हिंगोलीची मुख्य लढत झाली ती ठाकरे गटाचे नागेश पाटील अष्टीकर विरुद्ध शिंदे गटाचे बाबुराव कोहळीकर…ठाकरेंच्या बाजूने असणारी सहानुभूतीची लाट इथून वर्कआउट झाली आणि नागेश पाटील अष्टीकर हे तब्बल एक लाख 8 हजार 602 मतांनी विजयी झाले…पण आश्चर्यचकित करायला लावणारी बाब अशी की इथून वंचितच्या बि.डी. चव्हाण यांनी तब्बल एक लाख 61 हजार 814 मतं घेतली…बि.डी. चव्हाण येतात बंजारा समाजातून…हिंगोलीत या समाजाचं मोठं वर्चस्व आहे…चव्हाण यांनी मतदारसंघात बंजारा आणि ओबीसी समाजाची चांगली मूठ बांधली होती…हा ओबीसी आणि बंजारा समाज राजकारणात नेहमीच भाजपच्या पाठीशी राहिला पण इथे वंचितने खेळी केल्यामुळे निर्णायक मतं पदरात पाडून घेतल्याने महायुतीच्या उमेदवाराचा इथून पराभव झाला…

आता थोडं उलट गणित पाहिलं तर वंचितचा महायुतीच्या उमेदवाराला विजयी करण्यामध्ये महत्त्वाचा वाटा राहिला ती जागा म्हणजे मुंबई उत्तर पश्चिमची महाराष्ट्रात सर्वात घासून झालेली लोकसभा निवडणूक ही मुंबई उत्तर पश्चिमची… इथून शिंदे गटाचे रवींद्र वायकर ठाकरेंच्या अमोल कीर्तीकर यांच्या विरोधात अवघ्या 48 मतांनी निवडून आले… खरं म्हणजे ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीनंतर अमोल कीर्तीकर एका मताने आघाडीवर होते… पण बॅलेट पेपरवरची मतमोजणी झाल्यावर रवींद्र वायकर यांना विजयी घोषित करण्यात आलं…. हा गेला बाजार घटनाक्रम सगळ्यांच्या कानावर कित्येकदा पडला असेल… पण यात एका गोष्टीकडे कुणाचं लक्ष गेलं नाही ते म्हणजे वंचितच्या उमेदवाराला मिळालेल्या मतांवर…वंचितच्या परमेश्वर रणशूर यांनी इथून तब्बल दहा हजाराच्या आसपास मतं घेतली.. ही सर्व मतं हिंदुत्ववादी मतांच्या विरोधातील असल्याने ती अर्थातच अमोल कीर्तीकरांच्या पारड्यातील होती…त्यामुळे अमोल कीर्तीकर यांची उत्तर पश्चिम मधून मशाल विझण्यात मशालीचा इथून मोठा वाटा राहिला…

वंचितमुळे भाजपचा विजय सोपा झाला अशी पुढची जागा म्हणजे अकोल्याची…अकोल्याची जागा चर्चेत राहिली ती प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीमुळे…स्वतः आंबेडकर वंचितचे उमेदवार असल्याने VBA ची एक सीट कन्फर्म समजली जात होती… पण इथली लढत तिरंगी झाली…भाजपकडून अनुप धोत्रे, काँग्रेसकडून अभय पाटील आणि वंचित कडून आंबेडकर… या अटीतटीच्या झालेल्या लढतीत वंचित आणि काँग्रेसने एकमेकांची मतं खाल्ल्यामुळे इथून भाजपाचा फायदा झाला…आणि निवडून येण्याची अगदीच कमी शक्यता असलेले अनुप धोत्रे निवडून आले…तसं पाहायला गेलं तर काँग्रेससाठी अगदीच सहज सोपी असणारी ही जागा वंचित फॅक्टरमुळे अनेक वर्ष भाजपच्या दावणीला बांधली गेलीय…

वंचितमुळे महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा गेम झाला अशी पुढची जागा म्हणजे हातकणंगलेची…हातकणंगलेची लढत तशी चौरंगी झाली… पण मुख्य लढत होती ती शिंदे गटाचे धैर्यशील माने विरुद्ध ठाकरे गटाचे सत्यजित आबा सरुडकर… खरंतर प्रचारापासून ते एक्झिट पोलपर्यंत मशालच इथून निवडून येणार, यावर जणू शिक्कामोर्तब झाला होता… पण निकाल लागला आणि आश्चर्यकारकरित्या धैर्यशील माने इथून 13 हजार 426 मतांनी निवडून आले… इथेही महत्त्वाचा ठरला तो वंचित फॅक्टर…हातकणंगलेतून उभे राहिलेले वंचितचे उमेदवार डी. सी. पाटील 32 हजार 696 इतकी निर्णायक मतं घेतली… यामुळे शिंदे गटाच्या धैर्यशील माने यांच्या विजयाचा मार्ग सोपा झाला…यानंतरची सर्वात जास्त इंटरेस्टिंग राहिलेली आणि वंचितमुळे महायुतीच्या बाजूने झुकलेला मतदारसंघ तो अर्थात बुलढाण्याचा…बुलढाण्यात ठाकरे गटाकडून नरेंद्र खेडेकर, शिंदे गटाकडून प्रतापराव जाधव, अपक्ष रविकांत तुपकर आणि वंचितकडून वसंतराव मगर मैदानात होते…या चौरंगी लढतीत 29 हजार 479 मतांनी प्रतापराव जाधवांचा आश्चर्यकारकरित्या विजय झाला…यामध्ये वंचितच्या वसंतराव मगर यांना 98 हजार 441 मते मिळाली…थोडक्यात नरेंद्र खेडेकर यांच्या विजयाच्या मार्जिनहून तिप्पट मतं ही वंचितच्या उमेदवाराला मिळाली…इथेच ठाकरेंच्या उमेदवाराची मशाल विझली…

याचा अर्थ असा की वंचित इफेक्ट संपलाय…असा जो सूर सोशल मीडियातून समोर येतोय त्यासाठी ही आकडेवारी नक्कीच डोळे उघडणारी ठरू शकते… ठाकरे आणि शरद पवार यांच्या बाजूने असणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेमुळे यंदा वंचितला अगदी थोडासा स्कोप मिळाला पण त्यातही अनेक महत्त्वाच्या आणि लीडिंग मतदारसंघात गेमचेंजरची भूमिका प्रकाश आंबेडकरांनी पार पाडलीय…यामुळे कुणी कितीही नाकारलं…वंचितचा प्रभाव संपलाय…असे अर्थ काढले… तरी येणाऱ्या विधानसभेला वंचितला सिरियसलीच घ्यावं लागेल, एवढं निश्चित…बाकी महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वंचित चे किती आमदार निवडून येतील? तुमचा अंदाज काय सांगतो? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.