कोल्हापूर प्रतिनिधी | बारा वर्षे आमदारकी आणि तीन वर्षे मंत्रिपद भोगलेल्यांना पाचगाव आणि परिसराचा पाणी प्रश्न सोडवता आला नाही. निवडणूक जवळ आली की आपल्याला जनतेची फार काळजी आहे असे भासविण्याचा त्यांचा कावा आहे, असे पत्रक आमदार अमल महाडिक यांनी प्रसिद्धीस दिले आहे.
पत्रकात म्हटले आहे की, आमदार म्हणून निवडून आल्यानंतर आपण लोकांच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य दिले. डिसेंबर 2014 मध्ये बैठक घेऊन 5 कोटी 3 लाखांची योजना पाचगावसाठी मंजूर करून आणली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या माध्यमातून 26 जानेवारीपासून पाचगावला दिवसाला 14 लाख लिटर पाणीपुरवठा होत आहे. याव्यतिरिक्त ज्या भागात नियमित पाणीपुरवठा होत नाही त्यासाठी आमदार निधी, जिल्हा परिषद व नियोजन समितीमधून कामे करण्यात आली आहेत. गांधीनगरची पाणीपुरवठा योजना सक्षम करण्यासाठी टंचाई निधीतून 10 कोटी 53 लाख रुपये मंजूर करून घेतले.
तुमचे कर्तृत्व म्हणजे आयआरबी प्रकल्प आणि अपुरी थेट पाईपलाईन योजना हे सर्वांनाच माहीत आहे. त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्याचा उद्योग बंद करावा, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.