नवी दिल्ली । ट्रेड असोसिएशन इंडियन सेलर्स कलेक्टिव्ह अर्थात ISC (Indian Sellers Collective) ने आयटी क्षेत्रातील दिग्गज एन आर नारायण मूर्ती यांना ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन (Amazon) विरुद्ध भारतीय स्पर्धा आयोग अर्थात CCI (Competition Commission of India) ला सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
नारायण मूर्ती यांची कंपनी कॅटामरन आणि अॅमेझॉनने 2014 मध्ये Prione Business Services चा जॉईंट व्हेंचर सुरू केला. मात्र, सोमवारी दोघांनी सांगितले की,’त्यांनी मे 2022 नंतर हे जॉईंट व्हेंचर सुरू न ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.’
अॅमेझॉनसोबत JV चालू न ठेवल्याबद्दल ISC ने मूर्ती यांचे मानले आभार
हा जॉईंट व्हेंचर बंद करण्याच्या निर्णयाबद्दल ISC ने नारायण मूर्ती यांचे आभार मानले. मूर्ती यांना दिलेल्या खुल्या पत्रात, ISC ने म्हटले आहे की,” अॅमेझॉनची सहाय्यक कंपनी क्लाउडटेलने आर्थिक वर्ष 2014 ते 2020 दरम्यान 39,043 कोटी रुपयांच्या उत्पन्नात 5,856.45 कोटी रुपयांचा नफा कमावला आहे, जो कथितपणे या कंपन्यांकडून लहान विक्रेते आणि रिटेल विक्रेत्यांच्या कमाईतून घेतला गेला आहे. ही रक्कम कोविड रिलीफ फंडात जमा केली जावी.”
ISC सदस्य आणि प्रहार संघटनेचे अध्यक्ष अभय राज मिश्रा म्हणाले की,” नारायण मूर्ती यांनी अॅमेझॉनच्या अनैतिक पद्धतींची चौकशी करणाऱ्या CCI ला पाठिंबा देऊन भविष्यासाठी एक आदर्श ठेवावा.”
प्रहार व्यतिरिक्त, ISC मध्ये ऑल इंडिया ऑनलाइन वेंडर्स असोसिएशन, ऑल इंडिया कंझ्युमर प्रॉडक्ट्स डिस्ट्रीब्यूटर्स फेडरेशन, ऑल इंडिया मोबाइल रिटेलर्स असोसिएशन आणि फेडरेशन ऑफ ऑल इंडिया डिस्ट्रब्यूटर्स असोसिएशनचा समावेश आहे.