महापालिकेला पुर नियंत्रणासाठी मिळणार 14 कोटी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद – ऐतिहासिक औरंगाबाद शहरात मागील महिनाभरात दोन वेळा अतिवृष्टी झाली. त्यामुळे शहराच्या अनेक भागात नागरिकांच्या घरात तसेच व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. याअनुषंगाने विविध कामे करण्यासाठी महापालिकेला 14 कोटी 85 लाख 3 हजार 804 रुपयांचा निधी मिळणार आहे. हा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन महसूल व ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी महापालिकेला दिले होते. त्यानुसार शासनाने महापालिकेला माहिती कळविली आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात वारंवार अतिवृष्टी होत आहे. सप्टेबर महिन्यात 7 व 28 तारखेला अतिवृष्टी झाली. सात तारखेला झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक भागात नाल्याला पूर आला. त्यामुळे नाल्यालगतच्या वसाहतींमध्ये पावसाचे पाणी शिरुन मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या भागांची अब्दुल सत्तार यांनी 10 सप्टेंबरला पाहणी केली. त्यात श्रेयनगर, नूर कॉलनी, टाऊन हॉल, खाम नदी, जलाल कॉलनी भागात नुकसान झाल्याने सत्तार यांनी 14 कोटी 85 लाख 3 हजार 804 रुपयांचा निधी देण्याचे आश्वासन महापालिकेला दिले आहे.

त्यात श्रेयनगर येथील शलाका अपार्टमेंट जवळील नाल्याचे खोलीकरण करणे, रिटेनिंग वॉल बांधणे, नाल्यावर आरसीसी पूल बांधणे यासाठी 1 कोटी 38 लाख 99 हजार 683 रुपये, नुर कॉलनी येथील नाल्यास रिटेनिंग वॉल बांधण्यासाठी 72 लाख 82 हजार 479 रुपये, जलाल कॉलनी येथील नाल्यावर आरसीसी पूल बांधण्यासाठी 1 कोटी 3 लाख 61 हजार 611 रुपये, जलाल कॉलनी हिमायत बाग ते बेगमपुरा स्मशानभूमीपर्यंत नदीचे खोलीकरण करण्याच्या कामासाठी 4 कोटी 60 लाख 81 हजार 931 रुपये, सलीम अली सरोवर ते खाम नदी पर्यंत आरसीसी नाला व बॉक्स कव्ल्हर्ट बांधण्यासाठी 7 कोटी 8 लाख 78 हजार 100 रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

 

Leave a Comment