हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन Ameet Satam । आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भारतीय जनता पक्षाने मुंबईत मोठी खेळी खेळली आहे. भाजपने मुंबई अध्यक्षपदी अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार अमित साटम यांची मुंबई अध्यक्षपदी निवड केली आहे. अमित साटम हे मुंबई भाजपचा आक्रमक चेहरा म्हणून ओळखले जातात. एकीकडे मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीची चर्चा सुरु असताना आणि दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची शक्यता असताना ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपने हा मोठा डाव टाकलाय असं म्हणाव लागेल.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमीत साटम (Ameet Satam) यांची भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) मुंबई युनिटचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्याची घोषणा केली. अमित साटम यांनी विधानसभा आणि विविध व्यासपीठांवर भाजपची बाजू आक्रमकपणे मांडण्याचे काम केले आहे. त्यांना मुंबईकरांच्या प्रश्नांची, मुंबईतील नागरी समस्यांची चांगलीच जाण आहे. याशिवाय भाजपच्या वरिष्ठांच्या ते अतिशयम खास मर्जीतील म्हणून ओळखले जातात. यामुळे अमित साटम यांना मुंबई भाजपच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे बोललं जात आहे.
फडणवीस काय म्हणाले?
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी म्हंटल, अमित साटम ३ वेळा (Ameet Satam) आमदार म्हणून निवडून आले आहेत, त्यापूवी ते नगरसेवक होते. पक्षात काम करत असताना त्यांनी अनेक संघटनात्मक जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. अभ्यासू आणि आक्रमक अशी अमित साटम यांची ओळख आहे. मुंबईच्या राजकारणाची जाण आणि कल्पकता त्यांच्याकडे आहे. येत्या काळात त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप मुंबईत घोडदौड राखेल. अमित साटम सर्व संघटनात्मक जबाबदाऱ्या चांगल्या पद्धतीनं पार पडतील आणि मुंबई महापालिकेत पुन्हा एकदा महायुतीची सत्ता येईल असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
कोण आहेत अमित साटम ? Ameet Satam
अमित साटम हे मुंबईतील अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. २०१४, २०१९ आणि २०२४ अशा सलग ३ वेळा त्यांनी अंधेरी पश्चिम मधून विजय मिळवला आहे. अमित साटम यांचा जन्म 15 ऑगस्ट 1976 रोजी मुंबईत झाला. 1998 मध्ये मुंबई विद्यापीठाच्या मिठीबाई कॉलेज ऑफ आर्ट्समधून राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयात बॅचलर ऑफ आर्ट्स पूर्ण केले. शिक्षणानंतर अमित साटम मुंबईतील भाजप युवा मोर्चा आणि स्थानिक समित्यांमध्ये कार्यरत होते. त्यांनी अंधेरी पश्चिम मतदारसंघातून सलग ३ वेळा दणदणीत विजय मिळवला. अमित साटम यांना मुंबईच्या प्रश्नांची जाण आहे. विधानसभेतही मुंबईकरांचे प्रश्न ते आक्रमकपणे मांडताना दिसतात. महत्वाची बाब म्हणजे साटम हे आक्रमक राजकारणी असल्याने आणि ठाकरे बंधूना थेट शिंगावर घेण्यासाठीच त्यांना मुंबई भाजपचे अध्यक्षपद देण्यात आलं आहे कि काय अशा चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत.




