हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या काही दिवसांपासून भाजपमध्ये मोठया प्रमाणावर इनकमिंग सुरु आहे. आधीच एकनाथ शिंदे आणि अजित पवार भाजपमध्ये आहेत. काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजप अनेक बड्या नेत्यांना पक्षात घेत आहे. त्या पार्श्वभूमीवर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) याना पुन्हा एकदा एनडीए मध्ये घेणार का असा सवाल केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) याना करण्यात आला. मात्र यावेळी त्यांनी दिलेल्या उत्तराची जोरदार चर्चा सुरु आहे.
टीव्ही ९ नेटवर्कच्या वार्षिक कॉन्क्लेव्हमध्ये अमित शाह बोलत होते. यावेळी त्यांना उद्धव ठाकरेंबाबत प्रश्न विचारण्यात आलं. भाजपाने त्यांचा जुना सहकारी नितीश कुमार यांना एनडीएमध्ये घेतलं, त्याचप्रमाणे जर उद्धव ठाकरेंची एनडीएत परतण्याची इच्छा असेल तर भाजपा त्यांचं स्वागत करेल का? असा प्रश्न शाह यांना विचारण्यात आला असता ते म्हणाले, या जर-तरच्या चर्चेला काहीच अर्थ नाही. तुम्ही असा प्रश्न मला विचारून तुम्हाला हेडलाईन मिळणार नाही. तुम्ही मला आगामी निवडणुकीबाबत प्रश्न विचारा. अन्यथा तुमची वेळ संपेल.असं म्हणत अमित शाह यांनी उत्तर देणं टाळलं.
देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावेळी काय म्हंटल होत?
यापूर्वी अशाच एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस याना उद्धव ठाकरेंबद्दल विचारण्यात आलं होते. त्यावेळी त्यांनी ठामपणे सांगितलं होत कि भाजप आणि उद्धव ठाकरे एकत्र येतील अशी कोणतीही परिस्थिती नाही. उद्धव ठाकरे यांचा आमच्याबरोबर ज्याप्रकारचे व्यवहार राहिला आहे, ज्या प्रकारे खालच्या स्तरावर जाऊन ते सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करतात, या सगळ्या गोष्टींनी आमची मनं दुखावली गेली आहेत. जिथे मनं दुखावतात तिथे युती होत नाही. राजकीय मतभेद असतील तर ते दूर करून युती होते. परंतु, जिथे मनं दुरावलेली असतात, तिथे एकत्र येणं कठीण असतं असं म्हणत फडणवीसांनी ठाकरेंसोबतच्या युतीची चर्चा पूर्णपणे फेटाळली होती. आता अमित शहा यांनीही ठाकरेंबाबत बोलणं टाळल्याने भाजप आणि उद्धव ठाकरे यांचं काही जमेल अशी शक्यता फारच धूसर आहे.