हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी केली जाईल असं स्पष्ट विधान केंद्रोय गृहमंत्री अमित शाह यांनी केल आहे. श्रद्धानं दोन वर्षांपूर्वीच महाराष्ट्र पोलिसांना चिठ्ठी लिहून आफताबची तक्रार केल्याचं तपासातून समोर आलं होतं. मात्र त्यानंतर पोलिसांनी कोणतीही कारवाई का केली नाही ? या संदर्भात महाराष्ट्र पोलिसांची चौकशी होणार आहे. एका कार्यक्रमादरम्यान अमित शहांनी याबाबत माहिती दिली.
अमित शहा म्हणाले की, दिल्ली आणि मुंबई पोलिसांमध्ये समन्वयाचा अभाव नाही. परंतु जे पत्र समोर आले आहे, त्यात दिल्ली पोलिसांची भूमिका नाही. श्रद्धाने महाराष्ट्रातील एका पोलीस स्टेशनला पत्र पाठवून सांगितलं होत की तिला तिच्या शरीराचे तुकडे करून जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जात होत्या. तेथे कोणतीही कारवाई झाली नाही. त्यामुळे त्याठिकाणी पोलिसांची चौकशी केली जाईल. तेव्हा महाराष्ट्रात आमचे सरकार नव्हते. याप्रकरणी जो कोणी जबाबदार असेल त्याच्यावर कडक कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले.
या संपूर्ण प्रकरणावर माझं लक्ष आहे. मी देशातील जनतेला एवढंच सांगू इच्छितो की, ज्या कोणीही हे कृत्य केलं असेल, त्याला कमीत कमी वेळेत कायदा आणि न्यायालयाद्वारे कठोरात कठोर शिक्षा सुनावली जाईल असं आश्वासन अमित शाह यांनी दिले.
श्रद्धाच्या मित्राच्या जबाबीनुसार, श्रद्धाने स्वत: आफताबविरोधात मारहाण करत असल्याची तक्रार पोलीस स्टेशनमध्ये दिली होती. शिवाय त्याच्यापासून आपल्या जीवाला धोका असल्याचे देखील श्रद्धाने आपल्या तक्रारीत म्हटले होते. परंतु, तक्रार दिल्यापासून सुमारे 27 दिवस पोलिसांनी कोणतीच कारवाई केली नाही. त्यानंतर श्रद्धाने आफताबविरोधातील आपली तक्रार मागे घेतली.