अमरावती : हॅलो महाराष्ट्र – राज्यात कोरोनाचा जेव्हा मोठ्या प्रमाणात प्रसार सुरु होता तेव्हा अमरावती जिल्ह्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली होती. या घटनेमुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती. यामध्ये कोरोना टेस्टसाठी एका लॅब टेक्निशियनने चक्क तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतले होते. या प्रकरणात आरोपी लॅब टेक्निशियनला न्यायालयाने 10 वर्षे कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.
अमरावती जिल्ह्यातील बडनेरा येथील मोदी हॉस्पिटलमध्ये एका युवतीची कोरोना चाचणी पॉझिटीव्ह आल्याचे सांगून परत एकदा युवतीच्या गुप्तांगातून स्वाब घेण्यात आला होता. त्यामुळे मोदी हॉस्पिटलचा लॅब टेक्निशियन अलकेश अशोक देशमुख या आरोपी विरोधात बडनेरा पोलिसांनी बलात्कार आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता.या प्रकरणात जिल्हा सत्र न्यायालयाने 12 साक्षीदारांचा जबाब घेतला. यानंतर जिल्हा न्यायालयाने या प्रकरणावर निकाल देत आरोपी अलंकेश देशमुख याला 10 वर्षे सक्षम कारावास आणि 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रकरणी सरकारी पक्षाच्या वतीने सरकारी वकील सुनील देशमुख यांनी प्रभावी बाजू मांडली आहे.
काय आहे नेमके प्रकरण ?
अमरावती शहरातील एका मॉलमध्ये एक कर्मचारी पॉझिटिव्ह आढळल्याने संपूर्ण मॉलमधील कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. बडनेरा येथील ट्रामा केअर सेंटरमध्ये चाचणी करण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांची चाचणी झाल्यानंतर कोरोना सेंटरमध्ये कुणी नसल्याचा फायदा घेत अल्केश देशमुख या लॅब टेक्निशियनने पिडीत तरुणीला तुझा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे गुप्तांगातूनही स्वॅब घ्यावा लागणार असे सांगून गुप्तांगातून स्वॅब घेतला. हि धक्कादायक घटना 28 जुलै 2020 रोजी घडली आहे.