अमरावती प्रतिनिधी । आशिष गवई
शासकीय कर्मचाऱ्यांच्या कार्यालयीन वेळेत न पोहचण्याच्या दिरंगाईपणाचा चांगलाच अनुभव वरुड-मोर्शी मतदारसंघाचे आमदार देवेंद्र भुयार यांना आला आहे. आमदार देवेंद्र भुयार यांनी आज जिल्ह्यातील वरुड तहसील कार्यालयात आकस्मिक भेट दिली. यावेळी तब्बल २२ पेक्षा जास्त कर्मचारी अनुपस्थित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यानंतर संताप व्यक्त करत
त्यांनी अनुपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली.
सविस्तर माहितीनुसार, आमदार देवेंद्र भुयार हे अचानक तहसील कार्यालयात गेले, यावेळी तहसील कार्यालयात शुकशुकाट दिसून आला. त्यामुळे आमदार भुयार हे चांगलेच संतापले होते. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी शैलेश नवाल व वरुडचे तहसीलदार यांना गैरहजर कर्मचारी व अधिकारी यांच्यावर कारवाईची मागणी केली. आपल्या आकस्मिक तहसील भेटीत अनुपस्थित कर्मचारी व अधिकारी वेळेत उपस्थित राहत नसल्याचा मुद्दा आमदार भुयार यांनी उपस्थित केला. याशिवाय शासकीय कामाच्या वेळेत अधिकारी उपस्थित राहत नसल्यास त्यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे असा जोर धरला.
कर्मचारी आणि अधिकारी वर्गाच्या अनुपस्थितीवर संताप व्यक्त करताना भुयार म्हणाले कि, ” सकाळी १० वाजता वरुड तहसील कार्यालयाला भेट दिली असता. बरेच कर्मचारी व अधिकारी अनुउपस्थित असल्याचे निदर्शनास आले. या सर्व अनुपस्थित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर तहसीलदार यांच्या आदेशाने तात्काळ शिस्तभंगाची कारवाई आणि कारणे दाखवा नोटीस पाठवावी,” अशा सूचना तहसीलदार यांना दिल्या असल्याचे भुयार यांनी सांगितलं.
”महाविकास आघाडी सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांना दोन दिवसांची साप्ताहिक सुट्टी दिली आहे. अशा वेळी सर्वसामान्यांच्या कामाप्रती हे कर्मचारी नकारात्मक राहत असतील अशा सर्वांवर कारवाई केली जाईल. याशिवाय कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याने सामाजिक दायित्व आणि शासकीय नोकरदार म्हणून त्यानं वागलं पाहिजे,” असंही भुयार म्हणाले.
बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’