Amrit Bharat Scheme : मुंबईकरांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारच्या अमृत भारत योजनेअंतर्गत मुंबईतील तब्बल २० रेल्वे स्थानकांचा कायापालट करण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील 12 तर पश्चिम रेल्वेवरील 8 स्थानकांचा समावेश आहे. मुंबईतील अधिकाधिक नागरिक रेल्वेने प्रवास करण्यास प्राधान्य देत असतात. त्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांचा विकास झाल्यास मुंबईचे रुपडं पालटणार आहे.
भारतीय रेल्वेच्या वतीने अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत (Amrit Bharat Scheme) अपग्रेड आणि आधुनिकीकरणासाठी देशभरातील १३०९ रेल्वे स्थानकांचे काम केले जाणार आहे. यासाठी एकूण ४० हजार कोटींचा खर्च करण्यात येणार आहे. यामध्ये मुंबईतील एकूण २० रेल्वे स्टेशनच समावेश असून यासाठी तब्बल ५५४ कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या २६ फेब्रुवारी रोजी या कामाचा शुभारंभ करण्यात येईल.
मध्य रेल्वेवरील 12 रेल्वे स्टेशन कोणती? Amrit Bharat Scheme
अमृत भारत योजनेअंतर्गत मध्य रेल्वेच्या ज्या १२ रेल्वे स्टेशनचा चेहरामोहरा बदलणार आहे त्यामध्ये भायखळा, माटुंगा, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी,कुर्ला, विद्याविहार, मुंब्रा, दिवा, शहाड, टिटवाळा, वडाळा रोड, इगतपुरी आदि स्थानकांचा समावेश आहे. या विकासासाठी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागासाठी २६० कोटींचा निधी देण्यात आला आहे. यातील दिवा रेल्वे स्थानकासाठी सर्वात जास्त ४५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
पश्चिम रेल्वेवरील ८ रेल्वे स्टेशन कोणती?
पश्चिम रेल्वे मार्गावरील ज्या ८ स्थानकांचा पुनर्विकास होणार आहे. त्यामध्ये मरीन लाईन्स, चर्नी रोड, ग्रँड रोड, लोअर परळ, प्रभादेवी, जोगेश्वरी आणि मालाड रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. या स्थानकासाठी १२ मीटर रुंद पायी ओव्हर ब्रिजसाठी तरतूद करण्यात आली आहे. यापैकी जोगेश्वरी रेल्वे स्थानकाच्या पुनर्बांधणी आणि आधुनिकीकरणासाठी सर्वाधिक 50 कोटी खर्च केले जाणार आहेत.