Amrit Bharat Station Scheme : पंतप्रधान मोदींकडून अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ; देशात 508 स्थानकांचा पुनर्विकास होणार

Amrit Bharat Station Scheme

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन (Amrit Bharat Station Scheme)। देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज अमृत भारत स्टेशन योजनेचा शुभारंभ केला आहे. व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हा शुभारंभ पार पडला. या योजनेच्या माध्यमातून सध्या देशभरातील ५०८ रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहिती मोदींनी यावेळी दिली. यामध्ये महाराष्ट्रातील ४४ रेल्वे स्टेशनचा समावेश आहे. भारतीय रेल्वेच्या इतिहासातील हा एक नवा अध्याय सुरू होत असून अमृत भारत स्टेशन योजनेच्या माध्यमातून देशातील सुमारे 1300 प्रमुख रेल्वे स्थानके पुन्हा एकदा विकसित केले जातील असेही मोदी म्हणाले.

जगात दक्षिण आफ्रिका, युक्रेन, स्वीडन, यूके यांसारख्या देशांत रेल्वेचे जेवढे जाळे आहे तेवढेच रेल्वेचे जाळे भारताने मागील 9 वर्षांत तयार आहे. देशात एकूण 1300 रेल्वे स्थानकांपैकी 508 अमृत भारत स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. या सर्व कामासाठी जवळपास 25 हजार कोटी रुपये खर्च होणार आहेत. यासाठी मोदींनी देशाच्या रेल्वेमंत्र्यांचे आणि नागरिकांचे अभिनंदही केलं. येव्हडच नव्हे तर भारतीय रेल्वेचे आधुनिकीकरण करण्यासोबतच ती पर्यावरणपूरक बनवण्यावर आमचा भर असून 2030 पर्यंत भारत असा देश असेल ज्याची रेल्वे नेट शून्य उत्सर्जनावर धावेल अशी ग्वाहीही मोदीनी देशवासियांना दिली.

कोणत्या राज्यातील किती रेल्वे स्टेशनचा पुनर्विकास होणार- (Amrit Bharat Station Scheme)

अमृत भारत स्टेशन योजनेच्या (Amrit Bharat Station Scheme) माध्यमातून ज्या 508 स्थानकांचा पुनर्विकास केला जाणार आहे. त्यामध्ये उत्तर प्रदेश आणि राजस्थानमधील प्रत्येकी 55, बिहारमधील 49, महाराष्ट्रातील 44, पश्चिम बंगालमधील 37, मध्य प्रदेशातील 34, आसाममधील 32, ओडिशातील 25 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. तर पंजाब, गुजरात आणि तेलंगणात प्रत्येकी 22, झारखंडमध्ये 20, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये प्रत्येकी 18, हरियाणामध्ये 15 आणि कर्नाटकमध्ये 13 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आला आहे. या सर्व रेल्वे स्टेशनचा कायापालट बदलणार आहे.

मोदींनी विरोधकांवर साधला निशाणा

आपल्या भाषणात मोदींनी देशातील विरोधकांवर जोरदार निशाणा साधला आहे. विरोधक स्वतः काही करणार नाही आणि दुसऱ्यांना पण काही करू देणार नाही. यापूर्वी विरोधकांनी संसदेच्या नवीन इमारतीला विरोधकांनी विरोध केला, त्यांनी राजपथाला विरोध केला. आणि स्वतः मात्र ७० वर्षांत शहिदांचे युद्ध स्मारकही केले नाही, सरकार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटीसमोर कोणताही विरोधी नेता नतमस्तक झाला नाही असं म्हणत नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला.