कराड प्रतिनिधी | सकलेन मुलाणी
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त सातारा जिल्ह्यात काँग्रेस कडून 75 कि. मी. पदयात्रेचे आयोजन केले जाणार आहे. पदयात्रा नियोजनाची बैठक आज कराड दक्षिण काँग्रेस कमिटीच्या वतीने माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
यावेळी प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस उदयसिंह पाटील, प्रा. धनाजी काटकर, कराड दक्षिण महिला काँग्रेस अध्यक्षा विद्याताई थोरवडे, माजी जि. प. सदस्या मंगल गलांडे, माजी पं. स. सदस्या वैशाली वाघमारे, मलकापूर नगराध्यक्षा नीलम येडगे, माजी जि. प. सदस्य शंकरराव खबाले, माजी पं. स. सदस्य नामदेवराव पाटील आदिसह काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीचे नियोजन कराड दक्षिण काँग्रेस कमिटी चे अध्यक्ष मनोहर शिंदे यांनी केले होते.
आ. पृथ्वीराज चव्हाण म्हणाले कि, स्वातंत्र्य प्राप्तीसाठी क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांचे बलिदान दिले. ब्रिटिश सत्तेविरोधात देशातील जनतेने एक लढा उभारला त्या लढ्याला चळवळीचे स्वरूप काँग्रेसने निर्माण केले. यावेळी महात्मा गांधींनी पुढाकाराने अहिंसेच्या मार्गाने, सत्याग्रहाच्या मार्गाने देशात एक लोकचळवळ उभी केली. या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाचा व लढ्याचा इतिहास पुन्हा एकदा जागविण्यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त देशभर काँग्रेस पक्षाकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने पदयात्रा काढण्यात येणार आहे. अशी पदयात्रा आपल्या जिल्ह्यात सुद्धा काढली जाणार आहे. यामध्ये प्रत्येक तालुका काँग्रेस कमिटी आपापल्या ब्लॉक मध्ये पदयात्रेचे नियोजन करणार आहे.