Amritsar Train Accident | ट्रेनची धडकेने वडिलांच्या हातातून उडाली १० महिन्यांची चिमुकली, अनोळखी महिलेने घेतला झेल; आता घेणार दत्तक

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

अमृतसर | जोडा फाटकावर दसऱ्याच्या रात्री घडलेल्या रेल्वे अपघातात शेकडो लोकांचे आयुष्य नेहमीसाठी बदलले आहे. त्यापैकीच एक 10 महिन्यांची चिमुकली आपल्या वडिलांच्या कडेवर बसून रावण दहन पाहत होती. रावणाच्या फटक्यांचा आवाज इतका वाढला की समोरून भरधाव ट्रेन येत असल्याचे तिच्या वडिलांना कळलेच नाही. ट्रेनच्या धडकेत बाबांचा चेंदामेंदा झाला आणि मुलगी हवेत उंच उडाली. त्याच ठिकाणी थांबलेल्या एका 55 वर्षांच्या महिलेने तिचा झेल घेतला. मीरा देवी असे त्या महिलेचे नाव आहे. प्रत्यक्षदर्शी मांडताना तिचे डोळे पाणावले. अमृतसर रेल्वे अपघातात किमान 70 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो जखमी आहेत.

ती मला पाहून स्माइल देत होती, अचानक आली ट्रेन

मीरा देवी मूळच्या नेपाळच्या असून त्यांनी त्या रात्री घडलेला संपूर्ण घटनाक्रम सांगितला. “घटनेच्या दिवशी ती चिमुकली आपल्या आई-वडिलांसोबत होती. रावण दहन पाहताना ती आपल्या वडिलांच्या कडेवर होती. मी तिच्या आस-पास थांबले होते. ती मला पाहून स्माइल देत होती. त्याचवेळी अचानक आतषबाजी आणि फटाक्यांच्या आवाजासह रावण दहनाला सुरुवात झाली. आवाज इतका जोरदार होता की कधी भरधाव ट्रेन आली काही कळलेच नाही. त्या ट्रेनने तिचे वडील चिरडले गेले. झटका इतका जबरदस्त होता की ती हवेत उडाली. सुदैवाने मी तिचा झेल घेऊ शकले.”

…तर, मीच घेणार दत्तक
महिलेने सांगितल्याप्रमाणे, “चिमुकल्या मुलीच्या वडिलांचा माझ्या डोळ्यासमोर मृत्यू झाला. कदाचित आई जिवंत असेल या अपेक्षेने मी रात्री उशीरा पर्यंत रेल्वे ट्रॅक खांगाळत होते. त्या मुलीचा कुणीच वाली सापडला नाही तेव्हा पोलिसांत यासंदर्भातील माहिती दिली. सध्या ती मुलगी महिला न्यायाधीशांच्या ताब्यात आहे.” मीरा देवी सांगतात, की “या मुलीचे या जगात कुणीही नसतील तर मीच तिला दत्तक घेईन.”

Leave a Comment