हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केल्यांनतर राज्यात सर्वच स्तरातून त्यांच्यावर टीका केली जात आहे. राज्यपालांच्या विधानानंतर विरोधक आक्रमक झाले असून केंद्राने त्यांना परत दिल्लीला बोलवून घ्यावे अशी मागणी केली जात आहे. त्याच दरम्यान, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मात्र कोश्यारी यांची पाठराखण केली आहे. राज्यपाल मराठीवर प्रेम करणारे आहेत. मात्र मराठी बोलण्याच्या ओघात जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला असं म्हणत त्यांनी या प्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली.
पतंजलीच्या ठाण्यात आयोजित महिला महासंमेलनाला अमृता फडणवीसांनी हजेरी लावली. यावेळी त्या म्हणाल्या, मी राज्यपालांना व्यक्तिगत ओळखते. त्यांना मराठी भाषेचे प्रेम आहे. ते एकमेव राज्यपाल आहेत, जे मराठी शिकत आहेत. मराठी बोलण्याच्या ओघात जे बोलले त्याचा वेगळा अर्थ काढण्यात आला. असे म्हणत अमृता फडणवीस यांनी भगतसिंह कोश्यारी यांची पाठराखण केली आहे .
राज्यपाल कोश्यारी नेमकं काय म्हणाले ?
औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये दिक्षांतर समारंभ पार पडला या कार्यक्रम सोहळ्यात बोलत असताना भगतसिंह कोश्यारी यांनी शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श होते असं वादग्रस्त विधान केलं. आम्ही जेव्हा शाळेत असताना आम्हाला आमचे शिक्षक विचारायचे तुमचा आवडता नेता कोण आहे? तेव्हा ज्यांना सुभाषचंद्र बोस आवडायचे, ज्यांना गांधीजी आवडायचे आणि नेहरू आवडायचे ते त्यांची नावे घ्यायची. मात्र तुम्हाला जर कोणी विचारले तर तुम्हाला बाहेर कुठे जाण्याची गरज नाही. इथेच मिळतील तुम्हाला… शिवाजी महाराज तर जुन्या काळातील आहेत. मी आधुनिक काळाबाबत बोलत आहे असं म्हणत आता डॉ. आंबेडकरांपासून ते नितीन गडकरींपर्यंत सर्व आदर्श तुम्हाला मिळतील असं कोश्यारी म्हणाले. त्यांच्या या विधानानंतर महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले.