हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन : सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये तीव्र नाराजी पसरली. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. मराठा आरक्षण वरून राज्यात सध्या राजकारण तापलं असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी कोल्हापुरातील राजवाडा येथे छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेऊन संवाद साधला. तब्बल एक तास या दोघांमध्ये चर्चा सुरू होती. दरम्यान मराठा आरक्षणावरून त्यांच्यामध्ये काय चर्चा झाली असेल याबाबत उत्सुकता सर्वाना निर्माण झालेली होती. या चर्चेनंतर ठाकरे सरकार मराठा आरक्षणाबाबत सकारात्मक असल्याचे सांगत छत्रपती शाहू महाराज यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
चंद्र पाहिजे सूर्य पाहिजे म्हटलं तर कसं आणून देणार ?
याबाबत बोलता शाहू महाराज म्हणाले आमच्यात सर्व गोष्टींमध्ये चर्चा झाली असून अजित पवार यासंबंधी सविस्तर सांगतील. समाजासाठी जास्तीत जास्त जे चांगला आहे ते करता येईल ते करा असे मार्गदर्शन केले आहे अशी माहिती त्यांनी दिली आहे.मराठ्यांसाठी जास्तीत जास्त करण्यासाठी ठाकरे सरकार सकारात्मक आहे असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे. केंद्र सरकारने जर लक्ष दिलं आणि त्यांना रस असला तर कायद्यात बदल करूनच तुम्हाला पुढचं पाऊल टाकता येईल हे आधीच सांगितलं पाहिजे कायद्यात काय आहे हे सांगायला मी काही कायदेपंडित नाही असं ते यावेळी म्हणाले. पण जर तुम्ही चंद्र पाहिजे सूर्य पाहिजे म्हटलं तर कसं आणून देणार ? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
कोर्टाचा अवमान होता कामा नये
पुढे बोलताना ते म्हणाले मराठा समाजाने आता स्वतःला सक्षम होऊन आपल्या पायांवर उभे राहणे गरजेचे आहे. सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा ज्यांनी अभ्यास केला नाहीत त्यांनी तो करणं गरजेचं आहे. त्याचे मराठीत भाषांतर करून ते समजून घेतले पाहिजे तसेच कोर्टाचा अवमान होता कामा नये असं शाहू महाराज या वेळी बोलताना म्हणाले. सुप्रीम कोर्टाने निकाल दिला असून त्याचा अभ्यास करणे गरजेचे आहे तो निकाल समजून घेऊन जे शक्य आहे ते सर्व केलं पाहिजे. मराठा आरक्षणाच्या इतर मागण्यांकडे सरकारचे लक्ष असून यापुढेही राहणार आहे आंदोलनाबाबत आमच्यात कोणतीही चर्चा झाली नाही. असे देखील शाहू महाराज यांनी स्पष्ट केलं.